भारत अ महिला संघ अजिंक्य
बांगलादेश अ महिला संघ उपविजेता : तेजल हसबनीस सामनावीर
वृत्तसंस्था/ बँकॉक (थायलंड)
‘सामनावीर’ तेजल हसबनीसच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या 2025-26 च्या महिलांच्या आशिया चषक रायझिंग स्टारर्स टी-20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत अ महिला संघाने बांगलादेश अ महिला संघाचा 46 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या अंतिम सामन्यात कर्णधार राधा यादवची 36 धावांची खेळी आणि तेजलचे नाबाद अर्धशतक ही वैशिष्ट्यो ठरली.
या सामन्यात भारत अ महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 7 बाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेश संघाचा डाव 19.1 षटकात 88 धावांत आटोपला.
भारताच्या डावात नंदीनी काश्यप आणि दिनेश वृंदा यांनी 31 चेंडूत 30 धावांची भागिदारी केली. यानंतर भारताचे चार फलंदाज लवकर बाद झाले. वृंदाने 4 चौकारांसह 19 तर काश्यपने 1 चौकारासह 8 धावा केल्या. अनुष्का शर्मा 1 चौकारासह 8 धावांवर बाद झाली. मिनू मणीला खातेही उघडता आले नाही. तेजल हसबनीस आणि कर्णधार राधा यादव यांनी पाचव्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली. राधा यादवने 30 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. तनुजा कंवरने केवळ 1 धाव जमविली. प्रेमा रावत 4 धावावर बाद झाली. ममताने नाबाद 2 धावा केल्या. तेजल हसबनीसने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 34 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 51 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 32 धावा जमविताना 1 गडी गमाविला. तेजलने 33 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. बांगलादेश अ महिला संघातर्फे फहिमा खातूनने 25 धावांत 4 तर फर्जना इस्मिन आणि फातिमा जेहान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरदाखल खेळताना भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 19.1 षटकात 88 धावांत आटोपला. सलामीच्या शमीमा सुल्तानाने 15 चेंडूत 3 चौकारांसह 20, सर्मीन सुल्तानाने 30 चेंडूत 1 चौकारासह 18, कर्णधार फहिमा खातूनने 11 चेंडूत 1 चौकारासह 14 तर सादिया अख्तरने 15 चेंडूत 1 चौकारासह 10 धावा केल्या. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बांगलादेश महिला संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 36 धावा जमविताना 1 गडी गमाविला. भारतातर्फे प्रेमा रावतने 12 धावांत 3 तर सोनिया मेंदिया आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी 2 तर सईमा ठाकुर, मिनू मणी व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक - भारत अ महिला संघ 20 षटकात 7 बाद 134 (तेजल हसबनीस नाबाद 51, राधा यादव 36, दिनेश वृंदा 19, अवांतर 5, फहिमा खातून 4-25, इस्मिन, फातिमा जहान प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश अ महिला संघ 19.1 षटकात सर्वबाद 88 (शमीमा सुल्ताना 20, शर्मिन सुल्ताना 18, फहिमा खातून 14, सादिया अख्तर 10, प्रेमा रावत 3-12, सोनिया मेंदिया व तनुजा कंवर प्रत्येकी 2 बळी, सईमा ठाकुर, मिनू मणी, राधा यादव प्रत्येकी 1 बळी).