‘भारत’ मध्य आशियाचा सच्चा मित्र ‘भारत-ताश्कंद मैत्रीचा नवा सेतू
भारत-ताश्कंद मैत्रीचा नवा सेतू
ब्रिटिशकालीन अनिश्चितता आणि सोवियत रशियाच्या काळातील पोलादी पडदा दूर सारून आता उझबेक प्रजासत्ताक भारताबरोबर भक्कम मैत्रीचा हात पुढे करत आहे आणि भारताला सातत्यपूर्ण युरेनियम पुरवठा करण्याचा करार दृष्टिपथात आला आहे. उभय देशातील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संबंधांना एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल त्यांचा हा चौथा उझबेक दौरा खरोखरच फलदायी ठरला आहे.
सोवियत रशियापासून स्वतंत्र झालेले मध्य आशियातील देश आता स्वयं निर्णय घेऊन स्वत:च्या व शेजारी देशांच्या विकासासाठी सहकार्य करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. भारताने 2010 पासून असे सर्व पातळीवर मैत्रीपूर्ण संबंधाचे धोरण स्वीकारले तेव्हापासून सर्व मध्य आशियाई देश भारताबरोबर मैत्रीचा हात पुढे करत आहेत. विशेषत: भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनल्यामुळे आपणासही काही मदतीचा हात मिळू शकतो या आत्मविश्वासाच्या भावनेमुळे हे सर्व देश भारताबरोबर मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी सरसावले आहेत.
सर्व मध्य आशियाई देशांमध्ये उझबेकिस्तान हा सर्वात मोठा देश आहे. याच्या सर्व बाजूंनी प्रमुख मध्य आशियाई देशांच्या सीमा संलग्न आहेत. एकदा उझबेकिस्तानमध्ये प्रवेश केला की कुठल्याही देशात पोहोचणे सोपे होते. त्यामुळे प्रथम या देशाबरोबर आर्थिक व सामाजिक संबंध स्थापन केले पाहिजेत, या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चारवेळा उझबेकिस्तानला भेटी दिल्या आहेत. आत्ताची ही चौथी भेट आर्थिक आणि व्यापारी संबंधाचे सामाजिक संबंधात रूपांतर करण्यासाठी यशस्वी ठरली आहे, ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे. दिनांक 29 व 30 ऑगस्ट दरम्यान उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथील भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा केली.
सामरिक भागीदारी
भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान झालेल्या 13 सामंजस्य करारांचे सार काढले असता असे दिसते की यापूर्वीची आर्थिक भागीदारी आता सामरिक भागीदारीत रूपांतरीत झाली आहे. दोन्ही देश केवळ व्यापाराने बांधले आहेत असे नव्हे तर आता सामरिक दृष्टीने सुद्धा दोन्ही देशातील सराव प्रशिक्षण आणि संरक्षण सहकार्य या क्षेत्रात हळूहळू नव्याने दमदार पावले पडण्यास सुरुवात झाली आहे. या दौऱ्यानंतर दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना व्यापक सामाजिक भागीदारीचा दर्जा दिला आहे ही गोष्ट विशेषत्वाने अधोरेखित केली पाहिजे.
व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात द्विपक्षीय व्यापार वर्ष 2030 पर्यंत 5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे लक्ष ठरविण्यात आले आहे. ही बाब विशेषत्वाने नमूद केली पाहिजे. दोन्ही देशातील व्यापार वाढल्यामुळे उभय देशात रोजगार, सेवा संधी तसेच आर्थिक उलाढालीला गती प्राप्त होईल आणि प्राचीन सांस्कृतिक संबंधांचे आर्थिक संबंधात नव्याने पुनरुज्जीवन होईल.
ऊर्जा आणि खनिज संपत्ती शोध
दोन्ही देश या क्षेत्रात नवी धाडसी पावले टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. उझबेकिस्तानने भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यासाठी एक आराखडा तयार करण्यास सहमती दर्शविली आहे शिवाय दुर्मीळ खनिजांच्या शोध संदर्भात महत्त्वाच्या स्थळाबाबत चर्चा करण्यात आली आहे. भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा युरेनियमच्या पुरवठ्याबाबत होत असलेला करार हा निर्णायक आणि नवे वळण देणारा म्हणून नोंदविण्यात येत आहे.
यूपीआय तांत्रिक संवादाचे नवे पर्व
भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे होत असलेल्या नित्य आर्थिक व्यवहारास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून आर्थिक व्यवहार करणारा भारत हा जगातील सगळ्यात मोठा देश बनला आहे. आता उझबेकिस्तानने ही प्रणाली स्वीकारल्यामुळे तिची प्रतिष्ठा आणखीनच वाढली आहे
पर्यटन आणि सांस्कृतिक स्थळांचे संवर्धन
उझबेकिस्तानला दरवर्षी 80 हजार भारतीय पर्यटक भेट देतात. पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे, हे लक्षात घेऊन या प्रजासत्ताकाने पर्यटन व्यापार तसेच सांस्कृतिक लोकसंपर्क याला चालना देण्यासाठी भारतीय नागरिकांना 30 दिवसांचा व्हिसामुक्त प्रवास देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारत ताश्कंद यांच्यातील व्यापाराला नवी चालना मिळणार आहे. भारताच्यावतीने उझबेक प्रजासत्ताकातील दोन महत्त्वाच्या बौद्ध सांस्कृतिक पर्यटन स्थळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. हे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविण्यात येईल. त्यामुळे या देशाला भेट देणाऱ्या बौद्ध पर्यटकांची संख्या आणखी वाढू शकेल. फायाझ टेपा व कारा टेपा या दोन प्राचीन बौद्ध स्थळांचे शास्त्राrय पद्धतीने संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्प आखण्यात आला आहे तसेच या देशात योगाचा प्रसार करण्यात येणार आहे. लालबहादूर शास्त्राr व महात्मा गांधी केंद्रामार्फत शैक्षणिक सहकार्य प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. 300 विद्यार्थ्यांना हिंदी शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. लालबहादूर शास्त्राr यांच्या नावाने हे प्रकल्प आखले जातील शिवाय ताश्कंद विद्यापीठात संस्कृत अध्यासन स्थापन करण्यात येणार आहे व त्याला लालबहादूर शास्त्राr यांचे नाव देण्यात येईल. आजवर भारताच्या पूर्व पंतप्रधानांनी लालबहादूर शास्त्राr यांचे एवढे उचित स्मारक कधीही केले नव्हते त्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकडे जाते.
सर्वोच्च सन्मान मोलाचा
उझबेकिस्तान राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ‘ओली दराजाली दोस्लिक’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. हा सर्वश्रेष्ठ दर्जाची मैत्री दर्शविणारा पुरस्कार आहे शिवाय भारत उझबेकिस्तान संबंध एका उच्च पातळीवर नेण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा त्यांचा व भारतीयांचा तो सन्मान आहे असे म्हटले पाहिजे. या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की भारत आणि उझबेकिस्तान संबंध आता एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. दोन्ही देशांनी पारंपरिक मैत्री आता सामरिक भागीदारीच्या विशेष स्तरापर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. उझबेक प्रजासत्ताक भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे आणि भारतीयांना 30 दिवसांचा व्हिसामुक्त प्रवास या देशाला करता येईल. म्हणजे ताश्कंद नगरी भारतीय लोक मुक्त प्रेमाने अनुभविण्याची सुवर्णसंधी घेऊ शकतील़ उभय देशात सांस्कृतिक संबंध मजबूत होतील. क्रीडा क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण होईल अशा कितीतरी मौलिक तरतुदी असलेल्या 13 सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे दोन्ही देशातील आर्थिक संबंधांना नवी संस्कृतिक उंची प्रदान करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापाराची भरभराट होत आहे आणि परस्पर संरक्षणाची भागीदारीसुद्धा दृष्टीपथात आली आहे. नव्या वातावरणातील मैत्री पर्वाचे सर्वांनी स्वागत करावे असेच हे आशादायी चित्र आहे. उझबेक प्रजासत्ताकातील दोन बौद्ध स्थळांचे संगोपन संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी भरघोस सहाय्य या अद्भुत भेटीमुळे उझबेक जनता नरेंद्र मोदी यांच्यावर प्रसन्न झाली आहे.
प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर