For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारत अ संघ 46 धावांनी पिछाडीवर

06:58 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अ संघ 46 धावांनी पिछाडीवर
Advertisement

वृत्तसंस्था, ख्राईस्टचर्च

Advertisement

येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारत अ संघ 46 धावांनी पिछाडीवर राहिला आहे. या सामन्यात न्यूझीलंड अ चा पहिला डाव 424 धावांवर आटोपला. त्यानंतर भारत अ ने दुसऱ्या डावात बिनबाद 32 धावा जमविल्या.

या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात 346 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंड अ संघाने 3 बाद 218 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. 107 धावांवर नाबाद राहिलेला बॉईल सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि 14 चौकारांसह 110 धावा झळकविल्या. फॉक्सक्रॉफ्टने 226 चेंडूत 9 चौकारांसह 93 धावा जमविल्या. त्याचे शतक 7 धावांनी हुकले. बॉईल आणि फॉक्सक्रॉप्ट यांनी चौथ्या गड्यासाठी 208 धावांची द्विशतकी भागिदारी केली. मिचेल हे ने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31, ख्रिस्टेन क्लार्कने 6 चौकारांसह 41, शिटने 1 षटकार, 5 चौकारांसह 40 तर लिनॉक्सने 4 चौकारांसह नाबाद 32 आणि मॅकेने 2 चौकारांसह 33 धावा जमविल्या. न्यूझीलंड अ च्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा जमविल्याने न्यूझीलंड अ संघाला पहिल्या डावात 424 धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंड अ ने भारत अ संघावर 78 धावांची आघाडी मिळविली. भारत अ संघातर्फे मोहम्मद सिराजने 118 धावांत 4 तर मुकेश कुमारने 87 धावांत 5 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने 1 बळी मिळविला.

Advertisement

78 धावांनी पिछाडीवर राहिलेल्या भारत अ संघाने तिसऱ्या दिवसाअखेर सावध फलंदाजी करत 11 षटकांत बिनबाद 32 धावा जमविल्या. जैस्वाल 3 चौकारांसह 20 तर साई सुदर्शन 2 चौकारांसह 11 धावांवर खेळत आहे. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून हा सामना अनिर्णीत अवस्थेकडे झुकला आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत अ प. डाव 346, न्यूझीलंड प. डाव सर्वबाद 424 (बॉईल 110, फॉक्सक्रॉप्ट 93, हे 31, क्लार्क 41, शीट 40, लिनॉक्स नाबाद 32, मॅके 33, अवांतर 28, मुकेश कुमार 5-87, सिराज 4-118, वॉशिंग्टन सुंदर 1-81). भारत अ दु. डाव 11 षटकांत बिनबाद 32 (जैस्वाल खेळत आहे 20, साई सुदर्शन खेळत आहे 11).

Advertisement
Tags :

.