पाकिस्तान निवडणुकीत अपक्षांची सरशी
राष्ट्रीय पक्ष पडले मागे, मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानतील लोकसभेच्या निवडणुकीची मतगणना केली जात असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत अपक्षांनी राष्ट्रीय पक्षांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. पाकिस्तानातील लोकसभा राष्ट्रीय असेंब्ली म्हणून ओळखली जाते. तिच्या निवडून येणाऱ्या जागांची संख्या 266 आहे. आतापर्यंत 157 जागांची मतगणना पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवार 62 स्थानी विजयी झाले आहेत.
पाकिस्तानातील दोन राष्ट्रीय पक्ष नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग आणि बिलावल भुत्तो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हे दोन्ही पक्ष आतापर्यंतच्या शर्यतीत अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत मागे पडल्याचे दिसून येत आहे. शरीफ यांच्या पक्षाला 46 तर भुत्तो यांच्या पक्षाला 39 स्थानी विजय मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांची एकत्रित संख्या अपक्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हाच कल कायम राहिल्यास हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळवू शकतात, असे अनेक तज्ञांचे मत आहे. अद्याप 109 मतदारसंघांमधील परिणाम घोषित करण्यात आलेले नाही, अशी माहिती आहे. पूर्ण निकाल शनिवारीच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
गुरुवारी मतदान, त्वरित गणना
गुरुवारी राष्ट्रीय असेंब्लीच्या 265 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. एका जागेसाठीचे मतदान उमेदवाराच्या मृत्यूमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. साधारणत: 60 टक्के मतदान झाल्याची घोषणा तेथील निवडणूक आयोगाने केली होती. आधीच्या कलांच्या अनुसार त्या देशात अपक्ष सरकार स्थापन करु शकतात, असे बोलले जात होते. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसत आहे.
मतगणनेस विलंब
मतगणनेस कमालीचा विलंब लागत असल्याने गणनेत घोटाळा होत असल्याचा आरोप जोर धरु लागला आहे. प्रशासनाने मात्र, इंटरनेटच्या समस्येमुळे आणि सर्व्हर डाऊन झाल्याने मतगणना आणि तिचे परिणाम घोषित करण्यास वेळ लागत असल्याची सारवासारवी केली. इम्रान खान यांनी सकाळी 11 वाजताच विजयाचा दावा केला होता. लगोलग नवाझ शरीफ यांनीही स्वत:च्या पक्षाच्या विजयाचा दावा केला. पूर्ण मतगणना होण्यासाठी शनिवार पहाट होऊ शकेल, असे अनुमान आहे.
अनेक अपक्ष इम्रानखान समर्थित
निवडणूक आलेल्या अपक्षांपैकी किमान 80 टक्के उमेदवार सध्या कारागृहात असणारे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी समर्थन दिलेले आहेत, असे बोलले जात आहे. हे या निवडणुकीतील सर्वात मोठे आश्चर्य मानले जात आहे. इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने ते कारागृहात आहेत. तरीही त्यांचा या निवडणुकीवर प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. यावरुन तेथील राष्ट्रीय पक्षांनी जनतेचा विश्वास राखण्यात यश मिळविलेले नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप
मतगणनेत मोठ्या प्रमाणात गफलती होत असून शेवटी तेथील लष्कराला जो पंतप्रधान हवा आहे, तोच देशाची सूत्रे हाती घेईल अशी चर्चा आहे. पाकिस्तानात प्रत्येक वेळी लष्कराचा पाठिंबा असलेला नेताच पंतप्रधान होतो असा अनुभव आहे. गेल्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या बाजूने लष्कराने शक्ती उभी केली होती. त्यामुळे ते निवडून आले. यावेळी लष्कराची मर्जी नवाझ शरीफ यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना बहुमत मिळेल असे अनुमान होते. तथापि, इम्रान खान समर्थित उमेदवारांनी लष्करालाही धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे. लष्कराच्या साहाय्याने नवाझ शरीफ मतगणनेत गफलती करत आहेत. आपल्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांना घोटाळा करुन मागे पाडण्यात येत आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला. मात्र लष्कराने तो फेटाळला आहे. ही निवडणूक अत्यंत प्रामाणिकपणाने आणि पक्षपात विरहीत पद्धतीने झाली, असे प्रमाणपत्र पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने शुक्रवारी दुपारी दिले आहे.
#
ड पाकिस्तान निवडणूक मतगणनेत घोटाळा होत असल्याचा इम्रानचा आरोप
ड नवाझ शरीफ यांचा विजयाचा दावा, विजयाचे भाषण करण्याची महत्वाकांक्षा
ड शरीफ आणि भुत्तो यांच्या पक्षांच्या युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता
ड मोठ्या प्रमाणात निवडून आलेले अपक्ष काय करणार याकडे साऱ्यांचे लक्ष