वसगडेत रेल्वे बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
वसगडे :
पुणे-कोल्हापूर-लोंढा रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामादरम्यान वसगडे (ता. पलूस) येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रेल्वे रुळ टाकण्यात आले. या मुद्द्यावरून गेली तीन वर्षे शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाविरुद्ध संघर्ष सुरू आहे.
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून मोबदला देण्याचे मान्य केले होते. तसेच, गेल्या पाच वर्षांपासून ताब्यात घेतलेल्या जमिनीबाबत भुई भाडे (भूमीभाडे) देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अलीकडे प्रशासनाकडून याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, रेल्वेचे उपअभियंता दीपक कुमार यांनी 19 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या पत्रात, "शेतकरी बेकायदेशीरपणे रेल्वे रोको करतात व प्रवाशांकडून खंडणी वसूल करतात," असा गंभीर आरोप केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी 10 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. 11 जुलै रोजी झालेल्या बैठकीसाठी रेल्वेचे उप अभियंता (निर्माण) दीपक कुमार (सातारा), AXCN श्रीनिवास, रेल्वे पोलीस अधिकारी, भिलवडी पोलीस स्टेशनचे पालवे, महसूल विभागाचे अधिकारी, दुधोंडीचे जे. के. बापू जाधव तसेच 35-40 प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत रेल्वे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. दीपक कुमार यांनी आपल्याकडून पाठवलेल्या पत्राबद्दल माफी मागण्यास नकार दिला तसेच भुई भाडे बाबत निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, असे सांगून वाद अधिक तीव्र केला.
या सगळ्याचा निषेध म्हणून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज, 14 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.