For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इंदापुरातील 75 लाखांच्या भार्गवराम उद्यानाच्या कामावर निकृष्टतेचा आरोप; बसपाचे शिवाजी शिंदे उपोषणाला

02:09 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंदापुरातील 75 लाखांच्या भार्गवराम उद्यानाच्या कामावर निकृष्टतेचा आरोप  बसपाचे शिवाजी शिंदे उपोषणाला
Advertisement
इंदापूर : इंदापूर शहरातील भार्गवराम उद्यानाच्या 75 लाख रुपये खर्चाच्या सुशोभीकरण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप करत बहुजन समाज पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले. उद्यानाच्या कामाची निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भार्गवराम उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी सिंगापूर ट्री, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकवे, पेव्हर ब्लॉक, स्ट्रीट लाईट, कारंजे आणि गॅझिबो यांसारख्या विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष कामामध्ये अनेक बाबी अपूर्ण असून, पूर्ण झालेल्या कामांचा दर्जाही समाधानकारक नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

शहरातील विविध विकासकामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगत, सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशांतून होणारी कामे दर्जेदार आणि टिकाऊ असावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

तांत्रिक चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी

भार्गवराम उद्यानाच्या सुशोभीकरण कामाची स्वतंत्र तांत्रिक विभाग आणि क्वालिटी कंट्रोल यंत्रणेमार्फत सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच निकृष्ट काम केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मंजूर आराखड्यानुसार उद्यानातील सर्व कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना नियोजित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नगरपरिषद प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नगरपरिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवाजी शिंदे यांनी दिला आहे.

विकासकामांना विरोध नसून, जनतेच्या पैशातून होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारी असावीत, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.