For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इंदापूर तालुक्यातील 1,055 दिव्यांगांची दिवाळी गोड; 36.92 लाखांचे अनुदान खात्यात जमा

06:06 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंदापूर तालुक्यातील 1 055 दिव्यांगांची दिवाळी गोड  36 92 लाखांचे अनुदान खात्यात जमा
Advertisement
इंदापूर / प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘5 टक्के दिव्यांग कल्याण निधी’ योजनेतून तालुक्यातील 1 हजार 55 दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण 36 लाख 92 हजार 500 रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.

हे अनुदान थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे दिव्यांग बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत व्हावी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हातभार लागावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. सणासुदीच्या काळात अनुदान मिळाल्याने लाभार्थ्यांना आर्थिक नियोजनातही मदत होणार आहे.

पंचायत समितीच्या नियोजनातून अनुदान वितरण

अनुदान वितरणाची प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती इंदापूरच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक वैभव नाळे, अर्थ विभागाचे कॅशियर किरण गायकवाड आणि सहाय्यक लेखाधिकारी सोमनाथ मोहिते यांनी प्रशासकीय प्रक्रिया तत्परतेने पूर्ण केली.

Advertisement

शासकीय योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांशिवाय लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. प्रशासनाच्या या तत्पर कार्यवाहीमुळे दिव्यांग कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळाला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.