भारतीयांमध्ये क्रेडिट कार्डस्ची वाढती व्रेझ
सणासुदीत ऑक्टोबरमध्ये क्रेडिटकार्डद्वारे खर्च केले 1.78 लाख कोटी रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान, भारतात नवरात्री आणि दिवाळीसारखे मोठे सण साजरे झाले. दरम्यान, लोकांनी नवीन वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या सणासुदीच्या काळात, पॉइंट ऑफ सेल आणि ई-कॉमर्स पेमेंटमध्ये मजबूत वाढीमुळे भारतीयांचा क्रेडिट कार्डवरील खर्च 25.35 टक्क्यांनी वाढून ऑक्टोबर 2023 मध्ये 1.78 ट्रिलियन रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च 1.42 ट्रिलियन रुपये होता.
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक अंकित जैन म्हणाले, ऑक्टोबरमध्ये क्रेडिट कार्डावरील उच्च व्यवहार हे मुख्यत: सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीमुळे आणि ग्राहकांनी विविध वस्तुंची खरेदी केल्याने दिसले होते. पीओएसवरील व्यवहार वाढून 57774.35 कोटी रुपये झाले तर ई-कॉमर्स पेमेंट 120794.40 कोटीपर्यंत वाढले.
कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड किती वापरले?
बँकांबद्दल बोलायचे तर, क्रेडिट कार्ड प्रमुख एचडीएफसी बँकेचे व्यवहार गेल्या महिन्यात 38661.86 कोटी रुपयांवरून 45173.23 कोटी रुपयांवर घसरले. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवहारांमध्ये 34158 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कर्जाची मागणी घटणार?
असुरक्षित कर्जांबाबत आरबीआयच्या निर्णयामुळे कर्जाची मागणी आगामी काळात कमी होईल, अशी भीती दुसरीकडे व्यक्त केली जात आहे. तथापि, पुढे जाऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कडक नियमावलीमुळे आगामी काळात क्रेडिट कार्डअंतर्गत कर्जवाढीचे प्रमाण घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.