For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ

11:01 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनजागृतीमुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ
Advertisement

जिल्हा स्वीप समिती अध्यक्ष राहुल शिंदे यांची प्रतिक्रिया, जनतेचे मानले आभार 

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात 78.63 टक्के, बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49 टक्के मतदान झाले आहे. गेल्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत चिकोडी लोकसभा मतदारसंघात 3 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघात 4 टक्के मतदान वाढले आहे. स्वीप समितीकडून जागृती करण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याची प्रतिक्रिया जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये स्वीप समितीकडून मतदान जागृती करण्यात आली. यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये पथनाट्या, घरोघरी जावून कार्यक्रम, बोटींग, बाईक रॅली, पदयात्रा काढून जागृती मोहीम, नो युवर बुथ, ऑटोरिक्षामधून प्रचार, बसस्थानकांवर प्रचार, बैलगाडीतून प्रचार यात्रा, युवा मतदारांसाठी क्रिकेट स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर, चित्रकला अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

नागरिकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी सेल्फी स्टॅण्ड, युवा मतदारांची सभा, बाजार-विवाहस्थळी जनजागृती मोहीम, पुष्प देऊन मतदारांना आवाहन, सामाजिक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जागृती, हॉट एअर बलून, घरोघरी मतदारांना मतदार चिठ्ठ्या देऊन जागृती, अशा माध्यमांतून जागृत करण्यात आली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी बुथ, दिव्यांग मतदान केंद्र, युवा मतदार केंद्र अशाप्रकारे जिल्ह्यामध्ये विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. या माध्यमातून मतदान जागृतीस अधिक सोयीचे झाले. जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जागृती मोहिमांमध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, जिल्हा पंचायत, पोलीस कर्मचारी, सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांसह संघ, संस्था, जिल्हा आणि तालुका स्वीप समिती सदस्य, तसेच प्रसार माध्यमांचे सहकार्य मिळाल्याबद्दल चिकोडी लोकसभा निवडणूक अधिकारी व जिल्हा स्वीप समिती अध्यक्ष राहुल शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.