जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्या जबाबदारीत वाढ
पंचायतराज आयोगाच्या ‘विशेष अधिकारी’ पदाची अतिरिक्त जबाबदारी
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या जबाबदारीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचा कार्यभार सांभाळतानाच त्यांच्याकडे पंचायतराज आयोगाच्या ‘विशेष अधिकारी’ पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण विकासाशी संबंधित प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे उपसचिव कृष्णमूर्ती के. एच. यांनी याबाबत अधिसूचना जारी केली. पंचायतराज आयोगातील संस्थात्मक बदल, महत्त्वाच्या पदांवरील रिक्त जागा, प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता, तसेच राज्य आणि जिल्हास्तरावरील समन्वयातील अडथळे यामुळे ग्रामीण प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राहुल शिंदे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्राम पंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास योजना केवळ निधी मंजूर करून किंवा वितरित करून पूर्ण होत नाहीत. कामांची तांत्रिक तपासणी, गुणवत्तेची पडताळणी, निधीचा योग्य वापर, प्रकल्पाच्या प्रगतीवर देखरेख, विविध विभागांमध्ये समन्वय आणि केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असते. या प्रक्रियेत राज्यस्तरीय निर्णय आणि गाव पातळीवरील प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील दरी भरून काढण्याची महत्त्वाची भूमिका विशेष अधिकाऱ्यावर असणार आहे.
बेळगाव हा क्षेत्रफळ, लोकसंख्या व ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या संख्येच्यादृष्टीने मोठा जिल्हा आहे. विविध भौगोलिक परिस्थिती असलेल्या भागात एकाचवेळी अनेक विभागांचे प्रकल्प राबवावे लागतात. त्यामुळे जिल्हा पंचायत सीईओ म्हणून राहुल शिंदे यांना मिळालेला क्षेत्रीय अनुभव राज्यस्तरीय योजना व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे.