एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने मिळकतधारकांना आर्थिक फटका
ए, बी खात्यांतर्गत नोंदणीसाठी भरमसाट आकारणी : सामान्य नागरिक मेटाकुटीला
बेळगाव : राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपालिकांमध्ये ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतींची नोंद केली जात आहे. त्यानुसार खात्यांची नोंद करून घेण्यासाठी दररोज शेकडो मिळकतीधारक कार्यालयांमध्ये ये-जा करत आहेत. मात्र, एजंटांचा सुळसुळाट वाढला असल्याने मिळकतीधारक त्रस्त बनले आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 पासून मिळकतींच्या नोंदणीसाठी ई-खाते अनिवार्य केले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा अनधिकृत आणि अधिकृत मिळकतींच्या नोंदणीसाठी ए आणि बी खाते नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे मिळकतीधारक आवश्यक कागदपत्रांसह महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गर्दी करत आहेत.
पण मालमत्तांच्या नोंदणी प्रक्रियेने वेग घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एजंटांच्या मदतीने काही अधिकारी पैशांची मागणी करत असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीत 1 लाख 58 हजार 385 मिळकती आहेत. त्यापैकी 1 लाख 28 हजार 417 अधिकृत मिळकती ए खात्यांतर्गत येतात. तर अनधिकृत 29 हजार 968 या मिळकती बी खात्यांतर्गत येतात. बेळगाव महानगरपालिकेसह गोकाक, निपाणी नगरसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीत एकूण 4.54 लाख मिळकती आहेत. यापैकी 69 टक्के मिळकती अधिकृत आहेत. मात्र, महापालिकेकडे केवळ बी खात्यांतर्गत 146 मिळकतींची नोंद झाली असून 18 हजार 613 मिळकतींची ए खात्यांतर्गत नोंदणी झाली आहे.
मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज
मिळकतीधारक खात्यांची नोंदणी करून घेण्यासाठी महापालिकेत जात आहेत. आवश्यक कागदपत्रे दिली तरी देखील त्यांची फाईल मात्र पुढे सरकण्यास तयार नाही. वेगवेगळी कारणे सांगून मिळकतीची नोंदणी करून घेण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तीच फाईल एजंटाकरवी दिल्यास तातडीने त्याची नोंद केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, यासाठी मिळकतीधारकाकडून पैसे उकळले जात असल्याने एजंटांचा उपद्व्याप वाढला आहे. त्यामुळे याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.