ग्रंथपालांच्या वेतनात वाढ करा
बेळगाव : राज्यातील ग्राम पंचायत कार्यालयातील ग्रंथालयांमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करून ते थेट बँक खात्यात जमा करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ग्रंथपाल कर्मचारी संघाच्यावतीने गुरुवारी सुवर्णविधानसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यभरातील ग्राम पंचायत ग्रंथालयांमध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रंथपालांचे वेतन महिन्याच्या पाच तारखेपर्यंत खात्यात जमा करावे. ग्रंथपालांना पीएफ, ईएसआय यासह इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सेवानियमानुसार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, ग्रंथपालांना ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे कर्मचारी मानले जावे. किमान वेतनातील उर्वरित फरक तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्राम पंचायतींमध्ये ग्रंथालय चालविण्यासाठी ग्रंथपाल म्हणून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, सध्या या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने वेतन दिले जाते. हे वेतनदेखील कंत्राटदारामार्फत दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांना कोणत्याही सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या या ग्रंथपालांना सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.