जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमातीच्या निवासी शाळांची संख्या वाढवा
चलवादी महसभेची मागणी
बेळगाव : जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून वसतिगृहांची संख्या मात्र अल्प आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने निवासी शाळांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी चलवादी महासभा जिल्हा शाखेने केली आहे. शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार दि. 16 रोजी विधिमंडळ अनुसूचित जाती-जमाती कल्याण समिती अध्यक्ष पी. एम. नरेंद्रस्वामी यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. जिल्ह्यामध्ये मोरारजी देसाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती-जमाती विद्यार्थी वसतिगृहे कंत्राट पद्धतीने चालविण्यात येत आहेत. येथे काम करणाऱ्या ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. बेळगाव शहर, चिकोडी व निपाणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी प्रत्येकी दहा एकर जमीन मंजूर झाली आहे. या जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या नावे अभ्यास केंद्र, ग्रंथालय, वस्तूसंग्रहालय, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जादा अनुदानाची तरतूद करावी. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. निवेदन देताना चलवादी महासभेचे जिल्हा शाखा अध्यक्ष दुर्गेश मेत्री, उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, सचिव धनपाल अगसीमनी, तालुकाध्यक्ष परशराम कांबळे, राजू कोलकार आदी उपस्थित होते.