मलप्रभा बंधाऱ्याजवळील पात्राची खोली वाढवा
बंधाऱ्याची उंचीही वाढवणे आवश्यक : लोकप्रतिनिधीकडून पाठपुराव्याची गरज; पाणी अडवण्यापूर्वीच खोली वाढवणे अत्यंत महत्त्वाचे
खानापूर : खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जुना बंधारा काढून त्या ठिकाणी ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला. मात्र योग्य नियोजन न केल्याने बंधाऱ्याच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात वाळू आणि गाळ साचत असल्याने बंधाऱ्यांत पाणीसाठा कमी होत असल्याने बंधारा कुचकामी ठरला आहे. या बंधाऱ्याच्या वरील बाजूची नदी पात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे. तसेच बंधाऱ्याची उंचीही वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या दोन तीनवर्षात बंधाऱ्याच्या पातळीबरोबर वाळू आणि गाळाचा साठा जमा होणार असल्याने पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी पाटबंधारे खात्याकडून पाणी अडवण्यापूर्वीच नदी पात्रातील वाळू आणि गाळ काढून नदी पात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे.
शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून जुन्या चौदा मुशीच्या पुलाजवळ ब्रिजकम बंधाऱ्याची 2019 साली उभारणी केली. मात्र योग्य नियोजनाअभावी या ठिकाणी पाणी साठण्याची क्षमता अवघ्या सात वर्षातच कमी झाली आहे. या मागे दोन्हीकडील घाट तसेच बंधाऱ्याचे योग्य नियोजन नसल्याने या ठिकाणी अवघ्या सहा-सात वर्षातच मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू साचल्याने नदी पात्राची खोलीच एकदम कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम झालेला आहे. बंधाऱ्याची उंचीही कमी असल्याने घाटाच्या पश्चिमेकडील बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू साचली असल्याने बंधाऱ्याच्या उंचीबरोबच गाळाची उंचीही सारखीच झाली असल्याने पाणी अडवल्यानंतर या बंधाऱ्यात पाणीसाठा कमी होत आहे.
जॅकवेलच्या पुढे पाचशे मीटरपर्यंत नदी पात्राची खोली वाढवणे गरजेचे
मार्च महिन्यातच मलप्रभेचे पात्र कोरडे पडते. नवीन ब्रिजकम बंधारा बांधत असताना तो फक्त 16 फूट उंचीचा बांधला आहे. पहिल्या चारवर्षात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होत होती. मात्र बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूला मोठ्या प्रमाणात वाळू आणि गाळ जमा झाल्याने बंधाऱ्याच्या उंचीबरोबरच वाळू जमा झाल्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनदेखील लवकरच पात्र कोरडे पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी नव्या ब्रिजकम बंधाऱ्यापासून ते जॅकवेलच्या पुढे पाचशे मीटरपर्यंत नदी पात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे.
नदीची खोली वाढवण्यासाठी पाठपुरवठ्याची गरज
यासाठी आतापासूनच नियोजन करून पाणी अडवण्या अगोदरच नदी पात्राची खोली वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. नदी पात्राची खोली वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी, भुगर्भ विभाग यांची परवानगी आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधीनी आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी, प्रशासकानी, पाटबंधारे खाते, जिल्हाधिकारी आणि भूगर्भ खात्यांशी तातडीने संपर्क साधून मलप्रभा नदीची खोली वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. साठलेली वाळू काढून पात्र खोल करणे तसेच हत्ती गुंड्याजवळील कातळ फोडून खोली वाढवणे गरजेचे आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राकडून येणाऱ्या कुंभार नाल्याची खोली वाढवणे गरजेचे आहे. मलप्रभा नदीवर आमटे, मळव, देवाचीहट्टी, असोगा, खानापूर, कुप्पटगिरी साखर कारखाना, यडोगा असे बंधारे आहेत. पाणी अडविल्यास पिकाबरोबरच पाणीपुरवठा योजनेलाही मदत होईल.
बंधाऱ्याची उंची किमान 22 फूट आवश्यक
उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जॅकवेलपासून ते नवीन बंधाऱ्यापर्यंत पूर्णपणे पात्र कोरडे पडते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा तीन-चार दिवसातून एकदा करण्यात येतो. एप्रिल महिन्यापासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येतो. यासाठी मलप्रभेच्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. सध्या असलेल्या 16 फूट बंधाऱ्याची उंची किमान 22 फुटाच्या वर करणे गरजेचे आहे.