तृणधान्याचे क्षेत्र वाढण्याची गरज...जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन
मिलेट महोत्सवात 10 प्रकारची तृणधान्य विक्रीसाठी उपलब्ध
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या 20 वर्षापासून तृणधान्याचे (मिलेट)क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळेच सरकारने तृणधान्याची उत्पादकता वाडवण्यासाठी मिलेट वर्ष जाहीर केले आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी तृणधान्याचे क्षेत्र वाडवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने आयोजित मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहातील मिलेट महोत्सवात 10 प्रकारचे मिलेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, सामा, कोद्रा आदी प्रकारची तृणधान्य आहेत. हा महोत्सव 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पनन विभागाचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. तृणधान्यामध्ये ग्लुटेन कमी असून कॅल्शियम, प्रोटीन आणि लोह जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यदायी असतात. ही तृणधान्य खाण्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होत, रक्तदाबही होत काही. त्यामुळे मिलेट धान्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना अतिशय महत्व आहे. प्रास्ताविक पनन विभागाचे उप-सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले. नाबार्डचे उप-सरव्यवस्थापक आशुतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले. या महोत्सवामध्ये 45 मिलेटचे स्टॉल असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, छत्तीसगड, गोवा आदी भागातून शेतकरी, उद्योजक सहभागी झाले आहेत. नाचणी, बाजीर आणि ज्वारीपासून थालिपीठ, भजी, गोबीमंच्युरियन, बिस्किट, लाडू, चिवडा, कुरमुरे, पापड, पास्ता, नुडल्स उपीट, शिरा, आंबील, सोलकढी, रेडी टू इट पॅकेटमध्ये उपवासाचा डोसा, इडली, ढोकळा, आदींची तयार पिठ उपलब्ध आहेत. उद्घाटनानंतर मिलेट महोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पनीर केल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या निवळीपासून नाचणी आंबील आणि सोलकढी केली होती. छत्तीसगडचे मिलेट पदार्थ उत्पादक कृष्णा मोहन त्यांचा पदार्थ विकत घेवून खाणाराला संबंधीत पदार्थांची रेसिपी शिकवतात. आज (दि. 25) सायंकाळी 5 वाजता पाककृती शिकवली जाणार आहे. मिलेटच्या पदार्थांचे महत्व सांगणारी गिते कलाकारांनी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शहरातून मिलेट जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, पनन विभागाचे जितेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.