विदेशी चलन साठ्यात 964 दशलक्ष डॉलरची वाढ
वृत्तसंस्था, मुंबई
10 जुलैला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 964 देशलक्ष अमेरिकन डॉलरने वाढलेला दिसून आला. या योगे भारताचा विदेशी चलन साठा 675.157 अब्ज डॉलरवर पोहोचला. सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलनसाठा वाढलेला पहायला मिळाला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलनसाठा 7.26 अब्ज डॉलर्सने वाढत 674.193 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. याचवर्षी 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलनसाठा 728.494 अब्ज डॉलर्सवर विक्रमी स्तरावर पोहोचला होता. पश्चिम आशियातील संघर्षामुळे रुपयावर दबाव वाढला होता. यामुळे रिझर्व्ह बँकेला विदेशी चलनासंदर्भात हस्तक्षेप करावा लागला होता. याच दरम्यान 10 जुलैच्या आठवड्यात देशाचा सुवर्णसाठा 24 दशलक्ष डॉलरने वाढत 105.223 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. तसेच विदेशी चलन मालमत्ता 930 दशलक्ष डॉलर्सने वाढत 546.508 अब्ज डॉलर्सवर पोहचली होती.