रात्रीची गस्त वाढवा, प्रसंगी नाकाबंदी करा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पोलिसांना निर्देश : पोलिस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक
पणजी : राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आता कडक अमलबजावणी राबविण्यात येणार आहे. त्यासंबंधी पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. गुन्हेगारी घटना घडू नयेत किंवा वाढू नयेत, यासाठी रात्रीची गस्त वाढवावी तसेच प्रसंगी नाकाबंदीही करावी, असे आदेश पोलिस खात्याला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वास्को येथे दरोडा प्रकरणानंतर तसेच इतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची काल, बुधवारी बैठक घेतली. बैठकीला पोलिस महासंचालक आलोक कुमार, पोलिस महानिरीक्षक केशव राम चौरसिया, अधीक्षक सुनीता सावंत, अधीक्षक धर्मेश आंगले, यांच्यासह सर्व उपअधीक्षक, निरीक्षक आदी मोठे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलिस खाते सक्षम आहे. तरीही घटना वाढत आहेत. यासाठी कठोर कारवाई करण्याबाबतचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. चोरीसारख्या घटना रोखण्यासाठीही पोलिसांकडून आता संशयितांचीही तपासणी करण्यात येणार आहे. याचशिवाय ज्या संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा लोकांना ताब्यात घेण्याबाबतही पोलिस खात्याला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
रात्रीची गस्त वाढणार
गोव्यात परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणात येतात. आतापर्यंतच्या गुन्हेगारी घटना ह्या बाहेरील लोकांमुळे घडत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे नाकाबंदी आणि सीमेरेषवरच वाहनांची संशयितांची कडक तपासणी होणार आहे. रात्रीच्यावेळी पोलिस गस्त वाढविण्याबाबतची पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गुन्हेगारांची चौकशी होणार
राज्यात लहान मोठी कोणतीही गुन्हेगारी घटना असो. याच्याशी संबंध येणाऱ्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या लोकांची किंवा व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, अशा संशयितांचा पोलिस शोध घेणार असून, या सर्वांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.