एनडीआरएफ-एसडीआरएफ निधी वाढवा
भारतीय कृषक समाज-शेतकरी संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : चालू वर्षातील खरीप हंगामातील कृषी कामांना वेग आला असून राज्यातील शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे बियाणे, खते आणि इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ व एसडीआरएफ निधी वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषक समाज-शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. चालू हंगामात शेतीकामांसाठी लागणारे डिझेल पुरेशा प्रमाणात व अनुदानित दरात उपलब्ध करून दिले पाहिजे. पेरणीकाळात इंधनटंचाई निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतीकामांवर होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई निश्चित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करावी.
राज्यात बियाणे व खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार होण्याची शक्मयता आहे. यावर राज्य सरकारने आळा घालावा. जर अशा घटना आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून नुकसान वसूल करावे. यंदाच्या हंगामासाठी आवश्यक दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशकांचा तुटवडा भासू देऊ नये. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षणाची गरज असून सरकारने पावले उचलावीत.
शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढावा
पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत 2026-27 साठी ज्या शेतकऱ्यांनी पीकनिहाय विमा हप्ते भरले आहेत, त्यांच्यासाठी पावसाळी हंगामातील पीक काढणी प्रयोग सार्वजनिक करावेत. तसेच जिल्हास्तरावर पीकविमा तक्रार निवारण समित्या स्थापन करून शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढावा. पश्चिम घाट परिसरातील जंगलालगत वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, जीवितहानी, वैद्यकीय खर्च आणि वन्यजीव संघर्षामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसाठी दिली जाणारी नुकसानभरपाई वाढविण्यात यावी. वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडत असून याबाबत राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.