For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊसाचे क्षेत्र वाढले, खरिपाचे घटणार

03:10 PM May 19, 2025 IST | Radhika Patil
ऊसाचे क्षेत्र वाढले  खरिपाचे घटणार
Advertisement

सांगली :

Advertisement

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनांच्या आवर्तनामुळे दुष्काळी भागात फिरलेले पाणी आणि कारखान्याकडून मिळालेला चांगला दर यामुळे यावर्षी ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र सुमारे दोन हजार हेक्टरनी घटण्याची शक्यता आहे. परंतु गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढणारे मक्याचे क्षेत्रही खरिपात विक्रमी होणार असल्याचा कृषि विभागाचा अंदाज आहे. कृषी सहाय्यकांच्या संपाचेही सावट यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीवर पडले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच खरीप हंगामाची पूर्व तयारी आढावा बैठक घेतली. खते बियाणांचा पुरवठा, दर्जा आणि दरावरही तक्ष ठेवण्याच्या सुचना त्यांनी कृषि विभागाला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची तयारी सुरु असून शेतकर्यांची  लगबग सुरु झाली आहे. यावर्षी सुमारे दोन लाख ९५ हजार हेक्टरवर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. ही गृहीत धरून कृषी विभागाने खते आणि बियाणांची मागणी केली आहे.

Advertisement

  • खरीप ज्वारी घटली, मका वाढला

खरीप हंगामातील ज्वारीच्या पेरणीत गेल्या पाच वर्षापासून घट होऊ लागली आहे. पाच वर्षापूर्वी सरासरी ४९ हजार हेक्टरवर होणारी खरीप ज्वारीची पेरणी यावर्षी जेमतेम दहा हजार हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता आहे. कृषि विभागाने अद्याप या बीयाणांची मागणीच केलेली नाही. परंतु मका पिकाच्या क्षेत्रात गतीने वाढ होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात मक्याचा प्रतिक्विंटल दर २२०० ते २३०० रुपये टिकून आहे. याशिवाय ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय वाढल्याने मक्याच्या मुरघासाला मागणी वाढली आहे. सध्या बाजारातील मुरघासाचे दर प्रतिकिती साडेनऊ ते दहा रुपये तर शासकीय दर साडेसहा रूपये आहेत.

  • मक्याची मागणी दुप्पटीने वाढली, सोयाबीसह कडधान्यात घट

यावर्षी खरीप हंगामासाठी मका बीयाणांची मागणी दुपटीने वाढली आहे. गत हंगामात ४९७० क्विंटल मका बियाणांची मागणी यावर्षी ८५२० क्विंटलवर पोहोचली आहे. मक्याला मिळणारा दर आणि एकरी उत्पादनामुळे ही मागणी वाढली आहे. तर सोयाबीन, उडीद, मूग, भातासह अन्य बियाणांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गत खरीप हंगामात ३० हजार क्विंटलवर असणारी मागणी यावेळी २८ हजार क्विंटलपर्यंत करण्यात आली आहे.

  • खते बियाणे विक्रेत्यावर नजर

प्रत्येक वेळी खरीप अथवा रब्बी हंगामाच्या तोंडावर खते आणि बीयाणांची कृत्रिम टंचाई, लिंकींग काळाबाजार यावर चर्चा होते शेतक-यांच्या अडवणुकीचीही चर्चा होते. परंतु विक्रेत्यांवर कारवाईबाबत प्रशासनाचा हात आखडता असल्याचे चित्र आहे. यावर्षीही अकरा भरारी पक्कांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात खते आणि बियाणांच आठशेहून अधिक नमुने घेण्यात आले आहेत. तर चार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्याना खते आणि वियागे कमी पडणार नाहीत याची दक्षता कृषि विभागाने घेतली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुमार यांनी दिली.

यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी जूनच्या पहिल्या आठवडयात पावसाची शक्यता कमी आहे. गतवेळी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने खरीप पेरा चांगला साधला होता.

यावेळी २७ ते २८ मे नंतर जुलै महिन्यातच पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पेरणीची घाई शेतकर्यांना अडचणीची  ठरण्याची शक्यता आहे . त्यानुसारच कंपन्यांनीही बियाणांचा पुरवठा सुरू केला आहे.

Advertisement
Tags :

.