खासगी आराम बसच्या दरात वाढ
रेल्वे बुकिंग फुल्लचा परिणाम : परिवहन मंडळाच्या मर्यादित सेवा
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या सणासुदीचा काळ, सुट्या आणि वीकेंडमुळे बेळगावमधून पुणे, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, मंगळूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रेल्वेचे सर्व फेऱ्यांचे आरक्षण (बुकिंग) फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत खासगी आराम बस (ट्रॅव्हल्स) व्यावसायिकांनी मनमानी भाडेवाढ केली असून प्रवाशांना अव्वाच्यासव्वा पैसे मोजावे लागत आहेत.
दिवाळीनिमित्त महानगरातून बेळगावला येणाऱ्या व बेळगावमधून इतर शहरांना जाणाऱ्या सर्वच सेवा महागल्या आहेत. विशेषत: मुंबई-बेळगाव, पुणे-बेळगाव, बेंगळूर-बेळगाव, हैदराबाद-बेळगाव, मंगळूर-बेळगाव या मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नैर्त्रुत्य रेल्वेकडून मोजक्मयाच स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्याने त्यांचे तिकीट बुकिंग यापूर्वीच फुल्ल झाले आहे. परिवहन मंडळाने अतिरिक्त आराम बससेवा सुरू केलेली नाही. यामुळे नागरिकांना अधिक पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे.
रेल्वे आरक्षण वेटिंगवर
बेळगाव आणि पुणेदरम्यान प्रवास करण्यासाठी रेल्वे हा नेहमीच प्रवाशांचा सर्वात स्वस्त आणि सोयीचा पर्याय राहिला आहे. मात्र, सध्या अनेक रेल्वेंमध्ये ’वेटिंग लिस्ट’ (प्रतीक्षा यादी) देखील संपली आहे. ऐनवेळी प्रवास करणे गरजेचे असलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना रेल्वेचे तिकीट मिळेनासे झाले आहे. परिणामी प्रवाशांसमोर केवळ खासगी बसेसचा पर्याय उरला आहे. वंदे भारत वगळता इतर सर्व रेल्वेचे तिकीट फुल्ल आहे.
तिप्पट ते चौपट भाडेवाढ
रेल्वेच्या अनुपलब्धतेचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रतितिकीट दरात मनमानी वाढ केली आहे. बेळगाव ते पुणे सामान्यत: 600 ते 900 ऊपयांपर्यंत असणारे बसचे तिकीट सध्या हेच दर वाढवून थेट 1500 ते 2200 ऊपयांपर्यंत (काही लक्झरी बसेसमध्ये त्याहून अधिक) वसूल केले जात आहेत. प्रवासासाठी तिप्पट ते चौपट खर्च करावा लागत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
प्रवाशांमधून संतापाची लाट
वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ‘ऐन गर्दीच्यावेळी खासगी बस कंपन्या लूट करत आहेत. प्रशासनाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही का?’ असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. अनेकदा प्रवाशांना नाईलाजास्तव चढ्या दराने तिकिटे खरेदी करावी लागतात.
प्रशासनाने कारवाई करावी
प्रवाशांची ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तातडीने हस्तक्षेप करावा आणि खासगी बसचालकांच्या मनमानी दरांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच बेळगाव-पुणे, मुंबई- बेंगळूर मार्गावर जादा रेल्वे किंवा एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
बेळगावमधून इतर शहरांच्या सेवा-दर
शहर पूर्वीचा तिकीट दर आताचा तिकीट दर
पुणे 600 ते 900 1500 ते 2200
मुंबई 1000 ते 1800 1700 ते 3000
बेंगळूर 800 ते 1500 1200 ते 2000
हैदराबाद 1200 ते 2000 2000 ते 3500
