प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात पुन्हा वाढ
21 ते 31 ऑक्टोबरपर्यंत 10 ऐवजी 20 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागणार
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी सणादरम्यान रेल्वेस्टेशनवर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 21 ते 31 ऑक्टोबर यादरम्यान बेळगावसह हुबळी, बळ्ळारी, होस्पेट व विजापूर या मोठय़ा रेल्वेस्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांसोबत येणाऱया नागरिकांना 10 ऐवजी आता 20 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागणार आहे.
दसरा उत्सवातदेखील बेळगावसह काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली होती. आता दिवाळीतही वाढ करण्यात येणार असून, नागरिकांना फटका बसणार आहे. दिवाळीकाळात मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची रेल्वेस्थानकावर ये-जा असते. त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांमधून तीव्र संताप
एकीकडे प्रवाशांची संख्या वाढेल म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट वाढविले जात आहे तर दुसरीकडे मागणी करूनही स्पेशल रेल्वे सोडण्यात आली नाही. रेल्वेस्थानकावर स्पेशल रेल्वेच आली नाही तर गर्दी कशी होणार आहे? तसेच दररोजचे प्रवासी दररोजप्रमाणे दिवाळीतही प्रवास करणार असल्याने गर्दीचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.