कांद्याच्या दरामध्ये वाढ
प्रतिकिलो 55 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचला
बेळगाव : बेळगाव शहरात कांद्याचा दर वधारला आहे. 15 दिवसांपूर्वी असलेल्या कांद्याच्या दरामध्ये मंगळवारी वाढ झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो 55 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. लहान कांद्याचा दर 30 रुपये आहे. 15 दिवसांपूर्वी जुना कांदा 45 ते 50 रुपये व नवीन कांदा 30 ते 40 रुपये किलो होता. दिवाळीमध्ये चार दिवस मार्केट बंद असल्याने ग्राहकांना 45 ते 55 रुपये किलो दराने कांदा मिळाला. बागलकोट व बेंगळूर मार्केटमध्ये कांद्याचा दर वाढला असून बागलकोटमध्ये 5 हजार रुपये व बेंगळूरमध्ये 5,200 असा क्विंटलचा दर आहे. मोठ्या वळिवाच्या पावसामुळे जिल्ह्यात 37 हजार एकर ते 10 हजार एकरपर्यंत कांद्याचे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणात मार्पेटमध्ये गेलेला कांदा दुकानामध्ये तसाच पडून राहिला व वाहनांची सुविधा नसल्याने कांद्याची उचल झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बागलकोटमध्ये एक आठवड्यानंतर लिलाव झाला. कांद्याचा दर 31 ऑक्टोबरपासून किमान 100 रुपये ते कमाल 200 रुपये असा वाढीव मिळाला. तिसऱ्या व चौथ्या दर्जाच्या कांद्याला खरेदीदार न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला. मात्र दिवाळीनंतर शेतातून काढलेला कांदा वाळवून मार्केटमध्ये आलेल्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.