नंदगड क्रॉस येथे करणीबाधा प्रकारात वाढ
ग्रा. पं. ने सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, समस्त ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर/हलशी
नंदगड क्रॉस येथे गेल्या काही महिन्यांपासून काही अज्ञातांकडून करणीबाधेचे प्रकार सुरू आहेत. यासाठी नंदगड क्रॉसवर मोठ्या प्रमाणात करणीबाधा साहित्याचे उतारे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांत आणि विद्यार्थ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. यासाठी नंदगड ग्रा. पं. ने सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नंदगड-हल्याळ रस्त्यावरील नंदगड क्रॉस येथे अमावस्या व पौर्णिमा तसेच ठराविक दिवशी करणीबाधेचे प्रकार केले जात आहेत. नंदगड क्रॉस येथे करणीबाधा करण्यासाठी नारळ, पाणविडे, सुपारी, लिंबू, गुलाल, मिरची यासह वेगवेगळ्या प्रकारचे भयावह साहित्य टाकण्यात येते. या ठिकाणी बसथांबा असल्याने सकाळपासून विद्याार्थी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात खानापूर आणि बेळगाव, हल्याळ येथे जाण्यासाठी थांबलेले असतात. या करणीबाधा प्रकारामुळे विद्यार्थीवर्गात भीती निर्माण होत आहे. या ठिकाणी नंदगड गावात प्रवेशद्वाराची मोठी कमान आहे. यावर नंदगड पंचायतीचे सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र हे कॅमेरे फक्त शोभेचे वस्तू बनले आहेत. कायमस्वरुपी हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने अशा प्रकारांना ऊत येत आहे. नंदगड ग्रा. पं. ने सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून आणि विद्यार्थ्यांतून होत आहे. जर कॅमेरे सुरू झाल्यास अशा प्रकाराना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.