इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीत वाढ
मार्चमधील आकडेवारीचा समावेश: फ्लेक्सिकॅप फंडात सर्वाधिक 10,054 कोटी रुपयांचा ओघ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 56 टक्क्यांच्या वाढीसह 40,450 कोटी रुपयांचा ओघ दिसून आला, यात फ्लेक्सिकॅप फंड आघाडीवर होते. त्याच वेळी, डेट फंडातून 2.94 लाख कोटी रुपये आणि हायब्रीड फंडातून 16,538 कोटी रुपये काढण्यात आले. दुसरीकडे, ईटीएफ इंडेक्ससारख्या पॅसिव्ह फंडांमधील गुंतवणुकीत मोठी वाढ नोंदवली गेली.
मार्चमधील इक्विटी म्युच्युअल फंडातील ओघ
मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीत मोठी वाढ दिसून आली असून, ओघ 56 टक्क्यांनी वाढून 40,450 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत हा ओघ 25,977 कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिल्यास, यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षाच्या तुलनेत, गुंतवणुकीचा ओघ 61 टक्क्यांनी वाढून 25,082 कोटी रुपयांवर पोहोचला.
इक्विटी म्युच्युअल फंडांच्या 11 उपश्रेण्यांमध्ये, फ्लेक्सीकॅप फंडांमध्ये 10,054 कोटी रुपयांची सर्वाधिक गुंतवणूक झाली. सलग दुसऱ्या महिन्यात या फंडांमध्ये 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्मॉलकॅप फंडांमध्ये 6,263 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर मिडकॅप फंडांमध्ये 6,063 कोटी रुपयांचा ओघ होता. त्याच वेळी, व्हॅल्यू/कॉन्ट्रा फंडांमध्ये 2,155 कोटी रुपयांचा सर्वात कमी सकारात्मक ओघ नोंदवला गेला.
मार्च महिन्यात डेट म्युच्युअल फंडांमधून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर गेला. एकूण 2.94 लाख कोटी रुपयांची उचल नोंदवली गेली, तर फेब्रुवारीत फंडात 42,106 कोटी रुपयांची आवक झाली होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी मार्चमध्ये 2.02 लाख कोटी रुपयांची उचल नोंदवली गेली होती.
पॅसिव्ह फंडांमध्ये वाढलेली गुंतवणूक
एकीकडे डेट आणि हायब्रीड फंडांमधून निधी बाहेर गेला, तर दुसरीकडे पॅसिव्ह फंडांमधील गुंतवणूक वेगाने वाढली. यामध्ये इंडेक्स फंड आणि ईटीएफचा समावेश आहे. मार्चमध्ये या फंडांमधील गुंतवणूक 122 टक्क्यांनी वाढून 30,767 कोटी रुपयांवर पोहोचली.
डेट फंडांच्या सर्व विभागातील प्रवाह
मार्च महिन्यात डेट फंडांच्या 16 उप-श्रेण्यांमधील सर्व विभागात रोख प्रवाह दिसून आला. यापैकी, लिक्विड फंडांमधून सर्वाधिक 1.34 लाख कोटी रुपयांची उचल झाली. यानंतर ओव्हरनाइट फंडांमधून 40,227 कोटी रुपये आणि मनी मार्केट फंडांमधून 29,206 कोटी रुपयांची उचल झाली. क्रेडिट रिस्क फंडांमधून सर्वात कमी 329 कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला.