फळ, फुल, भाजी उत्पादनात वाढ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा : परराज्यातील आवक घटली 25 टक्क्यांनी
पणजी : राज्यातील कृषीक्षेत्रात भरीव प्रगती होत असून फलोत्पादन, फुलोत्पादन व भाजीपाला उत्पादन वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. काल मंगळवारी पणजीत झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स संमेलनात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात फलोत्पादन, फुलोत्पादन वाढल्यामुळे बाहेरुन येणाऱ्या भाज्यांची आवक 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. शिवाय गोव्यात भाजीपाला जास्त पिकू लागल्याने त्याची निर्यातही होऊ लागली आहे. बँकांच्या सहकार्यानेच कृषी क्षेत्राची भरभराट होत असून बँकांनी त्यासाठी स्वयंसेवी गट, महिला मंडळे, बचत गटांना कर्जपुरवठा करावा तसेच डिजिटल आणि ऑनलाईन साक्षरता वाढवावी. त्यातून कृषीक्षेत्र आणखी फुलेल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. कृषी व्यवसायात आता महिलादेखील पुढे येत असून त्यांना आर्थिक मदतीचा हात बँकांनी द्यावा.
गोव्यात 10 हजारपेक्षा जास्त ‘लखपती दिदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. त्यातून शेतकरीवर्ग, महिलांचे चांगले सक्षमीकरण होईल. त्यांची आर्थिक उन्नती घडेल, आत्मनिर्भर गोवा निर्माण होईल. स्थानिक शेतकऱ्यांकडून फलोत्पादन महामंडळ भाजी-फळे खरेदी करते. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोवा राज्य ग्रामीण जनजीवन मिशन अंतर्गत हे संमेलन आयोजिण्यात आले होते. त्या मिशनच्या अनुषंगाने गोव्यात 3000 पेक्षा अधिक स्वयंसेवी गटांची स्थापना झाली असून त्यांच्या सामूदायिक गुंतवणुकीतून कोट्यावधी रक्कम बँकेत जमा आहे. त्या गटांपैकी 150 हून अधिक अन्नपूर्णा सेवा गटांकडून मासिक तत्त्वावर रु. 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल होत असल्याची माहिती संमेलनातून देण्यात आली. विविध स्वयंसेवी गटातून 20 हजारपेक्षा अधिक महिला कार्यरत असून त्यांची वाटचाल सक्षमीकरणाकडे सुरू असल्याचे सांगण्यात आले.