अभियांत्रिकी, रसायने, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑगस्टमध्ये भारताच्या निर्यातीत 26 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे पाहता भारताची व्यापार तूट कमी होऊन 26.86 अब्ज डॉलरवर घसरली आहे. ही घट प्रामुख्याने वस्तूंच्या निर्यातीतील जोरदार वाढीमुळे झाली असल्याची माहिती आहे. निर्यातीच्या वाढीचा वेग जून 2022 नंतरचा सर्वात जलद असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाणिज्य विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्टमध्ये सेवा निर्यात 38.87 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, ती मागील ऑगस्टच्या तुलनेत जवळपास 25 टक्क्यांनी वाढली आहे, तर सेवा आयात 21.42 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यात 37 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यामुळे सेवा व्यापारात 17.45 अब्ज डॉलर्सचा व्यापार अधिशेष निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) या महिन्याच्या अखेरीस सेवा व्यापारावरील अंतिम आकडेवारी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
या आकडेवारीवर पत्रकारांना माहिती देताना, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, ‘ही अभूतपूर्व वाढ विविध प्रकारच्या वस्तू आणि प्रमुख भागीदार देशांमुळे झाली आहे.“ ते म्हणाले, ‘आम्ही अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि वस्त्राsद्योगात चांगली कामगिरी पाहिली आहे. तसेच, अमेरिका, युरोपियन युनियन (ईयू), ब्रिक्स राष्ट्रे आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडून मोठी मागणी आहे.“ अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वार्षिक तुलनेत जवळपास 24 टक्क्यांनी वाढून 12.32 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 2.93 अब्ज डॉलर्सवरून जवळपास दुप्पट होऊन 5.55 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्याचे ते म्हणाले आहेत.
पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात वाढली
पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात जवळपास 63 टक्क्यांनी वाढली आहे. ही निर्यात यायोगे 6.81 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे तर दुसरीकडे रसायनांच्या निर्यातीतही चमकदार कामगिरी केली गेली आहे. सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायनांची निर्यात 16 टक्क्यांहून अधिक वाढून 2.80 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. तज्ञ या प्रादेशिक प्रदर्शनाकडे एक उत्साहवर्धक चिन्ह म्हणून पाहत आहेत, कारण यातून हे दिसून येते की ही वाढ कोणत्याही एका निर्यात क्षेत्रापुरती मर्यादित नाही. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष एस. सी. राल्हन म्हणाले, ‘अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, पेट्रोलियम उत्पादने, ऑटोमोबाईल्स आणि इतर मूल्यवर्धित क्षेत्रे भारताच्या निर्यात क्षेत्राच्या विस्तारात योगदान देत आहेत.“
निर्यात वाढीची कारणे
भारताची निर्यात ही जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर वाढत असल्याची बाब तशी सुखावहच आहे. व्यापाराबाबत भारताची बदलती भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. 25 हजार कोटी रुपयांची निर्यात प्रोत्साहन मिशन (एक्सपोर्ट प्रमोशन मिशन) व सोबत 40 देशांशी मुक्त व्यापार यामुळे निर्यातीत वाढ नोंदवली जात आहे. 2021 पासून ऑस्ट्रेलिया, युएई व युनायटेड किंगडम यांच्यासह 40 देशांसोबत आता भारताचा मुक्त व्यापार होणार आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात येण्याची शक्यता सांगितली जात आहे. भारत व कॅनडा यांच्यातही व्यापार नव्याने साकारत आहे. भारत व युरोपियन संघ यांच्यातही मुक्त व्यापार करार वर्षाअखेर होण्याची शक्यता सांगितली जात आहे.