ऑक्टोबरमध्ये निर्यातीत वाढ
नवी दिल्ली :
सरकारकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशाच्या निर्यातीमध्ये गेल्या ऑक्टोबरमध्ये 6.21 टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. 33.57 अब्ज डॉलर्सची निर्यात एकंदर भारताने ऑक्टोबरमध्ये केली असल्याची बाबही सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
1 वर्षाच्या आधी याच महिन्यामध्ये 31.6 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताने केली होती. दुसरीकडे आयातीतदेखील भारताने सदरील महिन्यात वाढ दर्शविली आहे. ऑक्टोबर महिन्यात 65.03 अब्ज डॉलर्सची आयात भारताने विदेशातून केली होती. 2022 च्या ऑक्टोबरमध्ये हीच आयात 57.91 अब्ज डॉलर्सची राहिली होती.
7 महिन्यात 244.89 अब्ज डॉलर्सची निर्यात
चालु आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये 244.89 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताने केली आहे. सात महिन्याच्या कालावधीत 7 टक्के इतकी निर्यात घटली आहे. याच कालावधीत आयातदेखील 8.95 घटून 391.96 अब्ज डॉलर्सची राहिली आहे.
भाज्या, डाळींची आयात वाढली
विविध उत्पादनांच्या आयाती आणि निर्यातीचा विचार करता डाळींची आयात 112 टक्के वाढली आहे. तर फळे आणि भाज्यांची आयात सुध्दा 53 टक्के वाढीव राहिली आहे. मांस, डेअरी उत्पादने, औषधे, इलेक्ट्रानिक आणि अभियांत्रिकी वस्तु यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रानिक्स वस्तुंच्या आयातीचे प्रमाण 26 टक्क्यांनी वाढलेले पाहण्यास मिळाले.