श्रावण-गणेशोत्सवानंतर मांसाहाराच्या मागणीत वाढ
मटण, चिकन, मासळीला पसंती : खवय्यांची चंगळ
बेळगाव : श्रावण आणि गणेशोत्सवानंतर मांसाहाराच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: मटण, चिकन, अंडी आणि बांगड्यांनाही मागणी वाढू लागली आहे. अनेकांनी श्रावण आणि गणेशोत्सव काळात तब्बल दीड महिना मांसाहार वर्ज्य केला होता. मात्र गणेशोत्सव संपल्यानंतर मांसाहाराच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. शहरात मटण 700 रु. किलो, चिकन 220 रु. किलो, अंडी शेकडा 530 रु. तर बांगडा 150 रु. किलोप्रमाणे विकला जात आहे. अलीकडे गणेशोत्सव काळात उंदरीनिमित्त मांसाहार करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मांसाहारच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातही मटण-चिकन विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
बांगड्यांपेक्षा तूरडाळ महाग
भाजीपाला दरात भरमसाट वाढ झाली आहे. सर्रास भाजीपाला दर प्रति किलो 60 ते 70 रुपयांच्या पुढे गेला आहे. शिवाय कडधान्यदेखील 100 ते 150 रु. किलो झाले आहे. त्यामुळे चिकन आणि बांगड्यांना पसंती दिली जात आहे. तर तूरडाळ प्रति किलो 190 रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे बांगड्यांपेक्षा तूरडाळ महाग अशी परिस्थिती झाली आहे.
मासळी आवकेत वाढ
गणेशोत्सवानंतर अचानक वाढलेल्या मांसाहारच्या मागणीमुळे शहरात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना इकडून-तिकडून बकरी खरेदी करावी लागत आहेत. त्याबरोबर फिश मार्केटमध्येही मासळींची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही किरकोळ विक्रेते दाखल होऊ लागले आहेत. पापलेट, सुरमई, तारली, झिंगे यासह बांगड्याचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे.