सिगारेट विक्री, सेवन वयोमर्यादेत 21 वर्षांपर्यंत वाढ
विधानसभेत तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण विधेयक संमत : हुक्का बारवरही निर्बंध
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात यापुढे 21 वर्षांखालील युवक-युवतींना सिगारेट सेवन आणि विक्रीवर बंदी, तसेच हुक्का बारवर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केलेल्यांना 1 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची शक्यता आहे. राज्यात सिगारेट सेवनावरील वयोमर्यादा 18 वर्षांवरून 21 वर्षांपर्यंत वाढविण्यात येत आहे. यासंबंधीचे विधेयक बुधवारी विधानसभेत संमत करण्यात आले.
सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात, विक्री, साठा, उत्पादन आणि विनियम दुरुस्ती विधेयक बुधवारी विधानसभेत संमत करण्यात आले. सिगारेट विक्री व सेवनासाठी असणारी वयोमर्यादा 18 वर्षांवरून 21 वर्षे इतकी करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 100 रु. ते 1000 रु. पर्यंत दंडाची तरतूद या विधेयकात आहे. सदर विधेयक आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी मांडले.
विधेयकाविषयी बोलताना दिनेश गुंडूराव म्हणाले, बार आणि रेस्टारंटसह इतर ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या हुक्का बारमध्ये तंबाखू, निकोटीन, नार्कोटीक्सचा वापरला जातो. अनेक बार-रेस्टॉरंटमध्ये हुक्का बार चालविले जातात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाविरुद्ध हुक्का बारमालक न्यायालयात गेले आहेत. परंतु, न्यायालयाने विधेयकाला स्थगिती दिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
...तर कारावास
बेकायदेशीरपणे हुक्का बार चालविल्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कारावास तसेच ती शिक्षा 3 वर्षांपर्यंत वाढविण्याची तरतूद विधेयकामध्ये आहे. तसेच 50 हजार रु. ते 1 लाखापर्यंत दंड ठोठावण्याची मुभा विधेयकाद्वारे देण्यात आली आहे.
विरोधी पक्षाकडून समर्थन
सदर विधेयकावर समाधान व्यक्त करताना विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारच्या भूमिकेचे मुक्तकंठाने कौतुक केले. भाजपचे आमदार एस. सुरेशकुमार यांनी अत्यंत योग्य असणारे हे विधेयक असल्याची प्रतिक्रिया दिली.