For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-वेंगुर्ले खड्डेमय रस्त्यामुळे अपघातात वाढ

11:15 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वेंगुर्ले खड्डेमय रस्त्यामुळे अपघातात वाढ
Advertisement

चंदगड : बेळगाव-वेंगुर्ले रस्ता यंदा अतिशय खराब झाला असून वाहन चालवणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. रस्त्याची चाळण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांचे सस्पेंशन खराब होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने या रस्त्याच्या  दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. चंदगड तालुक्याच्या हद्दीतून गोव्यात प्रवास करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजार कानूर ते चंदगड फाटा, पुढे कुर्तनवाडी ते पाटणे फाटा, कुद्रेमनी फाटा ते शिनोळी पर्यंतच्या रस्त्यातून मोठ्या गाड्यांच्या वाहतुकीने रस्त्यातील धूळ मोठ्या प्रमाणात उडून मागून येणाऱ्या वाहनचालकांना दिसेनासा होतो. चार चाकी व दुचाकी वाहनधारकांचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Advertisement

सडेगुडवळे पासून ते शिनोळी पर्यंतचा 45 कि. मी. अंतराचा बेळगाव-वेंगुर्ले रस्ता आहे. पूर्वी महाराष्ट्राच्या हद्दीतील रस्ता खराब असायचा. परंतु यावर्षी महाराष्ट्रातील रस्त्यापेक्षा कर्नाटकातील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एक-दीड फूट खोलीचे खड्डे रस्त्यात निर्माण झाले असून त्यातून वाहन चालविणे कठीण झाले आहे. बेळगावला गाडी जाऊन आली की ती गाडी गॅरेजमध्ये न्यावीच लागते, अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा ऑक्टोबरच्या पूर्वार्धापासून रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू व्हायचे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला रस्ता वाहतुकीस योग्य असायचा. परंतु यावर्षी पावसाने खड्डे भरण्याची उसंत दिलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना देऊन तातडीने खड्डे भरण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.