Akshaya Tritiya 2025 Gold Rate : सोनं गेलं लाखापार, महिलांचं 'चिताकाचं' स्वप्न धूसर
काबाड कष्टातून पै-पै साठवायची. त्यातून गुजरीत जाऊन गुंज-गुंज सोनं घ्यायचं. या सोन्यातून ‘चिताक’ घडवायचं
By : संतोष पाटील
कोल्हापूर : घरात एखाद-दुसरं दुभतं जनावर पाळायचं, लेकरां-बाळांनी खाऊन राहिलेलं दूध डेअरीला घालायचं. काबाड कष्टातून पै-पै साठवायची. त्यातून गुजरीत जाऊन गुंज-गुंज सोनं घ्यायचं. या सोन्यातून ‘चिताक’ घडवायचं, हे कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेचं स्वप्न. पण सोन्याचे भाव लाखावर गेल्यानं सर्वसामान्य, कष्टकरी महिलांचं हा दागिना घेण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
जुन्या एकत्र कुटुंब पद्धतीत थोरली आई, मधली आणि आणि धाकली आईसह आजीच्या गळ्यात असलेलं सोन्याचं चिताक हे कष्टातून आलेल्या आर्थिक सुबत्तेचं प्रतिक मानलं जायचं. काळानुरुप सोन्याच्या दागिन्यांचा ट्रेंड बदलला. मात्र दुधाच्या साठवलेल्या पैशातून गुंज-गुंज सोनं घेण्याची कोल्हापूरची परंपरा कायम राहिली. हे सोनं आडीनडीला मोडून पैशाची उभारणी करणं, मुलीचं लग्न असो वा घर किंवा शेतातील विहीर यावेळी हमखास उशाला असलेला दागिना मोडून पैशाची उभारणी आजही केली जाते. एकूणच कोल्हापूरच्या अर्थकारणात शेती, दुधाचे पैसे आणि यातून होणारी सोन्याची खरेदी हे चक्र महत्वाची भूमिका बजावत आले आहे. आता सोन्याचा भाव वाढू लागल्याने हे आर्थिक चक्रच कोलमडून पडण्याची भीती आहे.
जिह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. येथील बहुसंख्य कुटुंबे दोन-चार दुभत्या जनावरांचे संगोपन करतात आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या दूधातून आपला उदरनिर्वाह करतात. घरात दोन लिटर दूध स्वत:साठी ठेवून उरलेले दूध डेअरीला विकले जाते. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबांचा संसार चालतो. विशेष म्हणजे, या दुग्ध व्यवसायाच्या अर्थकारणाची सूत्रे महिलांच्या हाती आहेत. त्या घर सांभाळतानाच या व्यवसायातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
जिह्यातील ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. येथील शेतकरी कुटुंबे शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायातूनही उत्पन्न मिळवतात. जिह्यात रोज 35 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते, यावरुन याची व्याप्ती लक्षात येते. एकटा गोकुळ दूध संघ दर 10 दिवसाला 45 कोटी रुपयांचे बिल दुग्ध उत्पादकांना अदा करतो. महिन्याला दीडशे कोटी रुपये ‘गोकुळ’कडून शेतकऱ्याच्या खात्यावर जातात. यावरुन दूध आणि सोनं खरेदी याची सांगड लक्षात येते.
विशेषत: महिलांनी या व्यवसायात मोलाची भूमिका बजावली आहे. त्या जनावरांची काळजी घेणे, दूध काढणे ते डेअरीपर्यंत पोहोचवणे अशी सर्व कामे करतात. त्यामुळे दुग्ध व्यवसायाचे अर्थकारण त्यांच्या हातात आहे, असे म्हटले जाते. ग्रामीण महिला कष्टातून साठवलेल्या या पैशातून सोन्याचे दागिने खरेदी करतात. त्यातही ‘चिताक’ हा कोल्हापुरातील प्रसिद्ध दागिना त्यांच्या गळ्यात शोभून दिसतो. ‘चिताक’ दागिना येथील महिलांसाठी केवळ आभूषण नसून, त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे.
हा सोन्याचा हार असून, त्यात सोन्याच्या छोट्या-छोट्या प्लेट्स एकत्र जोडलेल्या असतात. अनेक महिलांनी आपल्या कष्टाच्या पैशातून थोडे-थोडे सोने जमा करून हा दागिना घेण्याचे स्वप्न बघत ते हिमतीने सत्यात उतरले. कोगे गावातील लताबाई पाटील म्हणाल्या, मी चिताक करण्यासाठी 10 वरीस पैका साठवत होतो. आताच्या दराचा हिशोब केला, तर दोन आयुष्य लागतील. यावरुन सोन्याची दरवाढ आणि त्याची खरेदी कष्टकरी महिलांच्या कशी हाताबाहेर गेली आहे, हे कळते.
सोन्याच्या दरानं डोळं पांढरं व्हायची वेळ
"दुधाच्या साठवलेल्या पैशातून एका वर्षी श्रावणात चिताक घेतलं होतं. त्यानंतर एक दिवाळीत पाटल्या केल्या. तेव्हा स्वस्ताई होती. म्हणून सगळ जमलं. आता सोन्याचा दर बघून डोळं पांढरं व्हायची वेळ आलीय. आताच्या महागाईत पैका साठवून कुठलं चिताक आन् कुठल्या पाटल्या..?"
- श्रीमती अनुसया गायकवाड, दूध उत्पादक शेतकरी, कसबा बावडा
चिताक करण्याचं स्वप्न अपूर्णच...
"वडणगेतील पार्वती चौगले यांनी आयुष्यभर कष्ट करुन शेती करत जनावरे पाळून कुटुंबाचा गाडा चालवला. मुलांना शेतामध्ये कष्ट करुन मोठे केले. शेतात पिकवलेला भाजीपाला तसेच ऊस पिकातून जे उत्पन्न येत होते, त्यातून संसाराचा गाडा हाकत पै-पै जमा करुन छोटे मोठे दागिने करायच्या. नव्वदी ओलांडली मात्र अजूनही आपण चिताक करु शकलो नाही. आता सोन्याचे दर आता लाखांच्या घरात गेले आहे. वयाच्या 92 व्या वर्षीही आपले चिताक करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे."
- पार्वती राजाराम चौगले, गृहिणी, वडणगे
सोन्याची खरेदी किलोवरून आता तोळ्यावर!
"एखाद्या दागिन्याची खरेदी ही पूर्वीच्या पाच ते दहा तोळ्याची असे. यासाठी अॅडव्हॉन्स बुकींगही करावे लागत होते. आज सोन्याचा दर 1 लाख रूपये झाला असून, या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोकांची खरेदी आता तोळ्यावरून गुंजभर होणार असल्याचे चित्र आहे. सोन्याचा दर 60 हजार रूपये 10 ग्रॅम असताना देखील खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असे. पण आता सोन्याचा दर लाखावर पोहोचल्याने, आता सराफ बाजारात शांतता जाणवत आहे. चीन-अमेरिका व्यापार युध्द, युक्रेन युध्द व काश्मिरमधील पर्यटकांची हत्या आणि जागतिक अस्थिरता या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. व्याजाचे दरही कमी झाल्याने, सोने दरवाढीला हे सुध्दा कारण आहे. लाईट वेट म्हणजे कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी या अक्षय तृतीयेसाठी असणार आहे."
- देवीचंद ओसवाल, महेंद्र ज्वेलर्स
बजेट तेच, वजन मात्र कमी...
"गेले 40 वर्षे सोने विक्रीचा बुलियन व्यवसाय करत आहे. या 40 वर्षात सोन्यामधील तेजी-मंदीचा मोठा अनुभव आहे. या अनुभवावरच येत्या दिवाळीपूर्वीच सोने सव्वालाख रूपये होणार असल्याची खात्री आहे. अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावरच खरेदी होणाऱ्या सोन्यामध्ये वाढ होत असते, असा समज आहे. यामुळे दर कितीही वाढला, तरी लोकांचे बुकिंगही वाढत आहे. फक्त किती वजनाचा दागिना घ्यायचा, त्यापेक्षा आपल्या बजेटवरच सोने खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांकडून उसाची बिले मिळत आहेत. तसेच डेअरी वा दुग्ध व्यवसायामधील फरक मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. तसेच महिलांकडून बचत होत असल्याने, गुंजभर तरी मुहूर्तावर सोने खरेदी होईलच."
- राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ
शेतकरी हाच खरा सोने खरेदीचा ग्राहक
"पूर्वी दागिन्याचे डिझाईन ही ठराविक आणि पारंपारिक होते. आता सोन्याची खरेदी करण्याची इच्छा असून देखील, वाढलेल्या दरामुळे सोने खरेदीला ब्रेक लागला आहे. दरवाढीमुळे सर्वांमध्ये संभ्रमावस्था आहे. याचा परिणाम सराफ बाजारावरही झाला आहे. लोकांच्यात अजूनही सोन्याचा दर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. कोरोनानंतर दिवाळीपेक्षा जास्त सोन्याची दुप्पट विक्री झाली आहे. लाईट वेटचे ‘निकष’ या पद्धतीचे दागिने बाजारात आले आहेत. याला चांगला प्रतिसाद आहे."
- मुरली चिपडे, गोपीनाथ अनंत चिपडे सराफ
सोनेदर वाढल्याने स्वप्नांवर पडले पाणी...
सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे चिताक हा सोन्याचा दागिना घेण्याच्या महिलांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून, भारतातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला एक लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना सोने खरेदी करणे अत्यंत कठीण झाले आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी, विशेषत: महिलांसाठी, सोन्याच्या किमतींमधील ही वाढ एक मोठे आव्हान आहे. त्यांच्या कष्टातून साठवलेल्या पैशातून त्या आपल्या आवडत्या दागिन्यांचे स्वप्न पाहत होत्या, परंतु आता ते स्वप्न दूरचे वाटू लागल्याची प्रतिक्रिया सोने कारागिर सुनिल जामसांडेकर यांनी दिली.