मुतगे येथे अंडरब्रिज बांधून गैरसोय दूर करावी
मुतगे येथील भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे ग्रामस्थांनी केली मागणी : जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडूनच यावे जावे लागते. यासाठी शासनाने येथे अंडरब्रिज बांधून गैरसोय दूर करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे ग्रामस्थांनी केली. ते सोमवार दि. 9 रोजी सांबरा विमानतळ रस्त्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी गावामध्ये आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे ही मागणी केली. बेळगाव-बागलकोट हा राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मुतगे येथे रस्त्याशेजारी शाळा असल्याने तसेच शेतकरी वर्गाला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडूनच यावे जावे लागते. यासाठी शासनाने येथे अंडरब्रिज बांधल्यास अपघाताचा धोका टळून शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होऊ शकते. यासाठी शासनाने यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता एस. एस. सोबरद यांना रस्त्याची पाहणी करण्यासाठी सांगितले. त्यानुसार अभियंता एस. एस. सोबरद व सहकारी मारुती आदापुर यांनी लागलीच रस्त्याची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रांताधिकारी श्रवण नाईक व अभियंता एस. एस. सोबरद हे पहिल्यांदाच मुतगे येथे बैठकीनिमित्त आले होते. त्यानिमित्त त्यांचा ग्रामस्थ व श्री भावकेश्वरी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. चेअरमन उमेश पुरी व संचालक हेमंत पाटील यांनी त्यांचा शाल घालून व पुष्पहार देऊन सत्कार केला. याप्रसंगी संचालक सुहास पाटील, सेक्रेटरी भाऊराव जाधवसह आप्पाण्णा चौगुले, कृष्णा पाटील, विक्रम पाटील, महेश पाटील, सुभाष पुरी, पारिस जक्कन्नावर, संभाजी पाटील, नारायण कणबरकर आदी उपस्थित होते.