बोंडला प्राणीसंग्रहालय बंदची सूचना न दिल्याने गैरसोय
पर्यटकांची गैरसोय, प्राण्यांच्या मृत्यूमुळे आठवड्याभरापासून बंद
फोंडा : बोंडला येथील प्राणीसंग्रहालय गेल्या आठवड्यापासून कुठलीच पूर्वसूचना न देता बंद ठेवण्यात आल्याने वन्यप्राणी पाहण्यासाठी लांबवऊन येणाऱ्या पर्यटकांना माघारी फिरावे लागत आहे. वन्यखात्यातर्फे यासंबंधी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने राज्यातील हे एकमेव व महत्त्वाचे प्राणीसंग्रहालय नेमके कोणत्या कारणासाठी बंद ठेवण्यात आले आहे, हा चर्चेचा विषय बनून राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वी विशिष्ट संसर्गामुळे तेथील काही प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये काही वयोवृद्ध काटांदर या प्राण्यांचाही समावेश आहे.
बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचा अंदाज
पशुसंवर्धन खात्याच्या एका पशुवैद्यकामार्फत येथील प्राण्यांची तपासणी केल्यानंतर प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारा संसर्ग म्हणजे बर्ड फ्लू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विविध ठिकाणी पिंजऱ्यामध्ये असलेल्या वन्य प्राण्यांना सुरक्षित जागी हलविण्याची खबरदारी घेण्यात आली.
काहींचा अहवाल येणे बाकी
संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या बहुतेक प्राण्यांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काहींचा अहवाल उपलब्ध झाला असून इतर राज्यांमध्ये पाठविलेल्या काही नमुन्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. सध्या येथील सर्व प्राणी आपापल्या पिंजऱ्यात सुरक्षित असले तरी बंद केलेले प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी अद्याप खुले केलेले नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या गोव्यातील तसेच अन्य राज्यातील पर्यटकांना गेट बंद असल्याने माघारी फिरावे लागत आहेत. प्राणी संग्रहालयातील एकापेक्षा अधिक प्राण्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्यास किंवा क्रमाक्रमाने मृत्यू झाल्यास किमान 15 दिवस प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचा नियम आहे.
वन खात्याकडून सौजन्याची ऐशीतैशी
प्राणीसंग्रहालय बंद ठेवायचे असल्यास वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमे किंवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यामार्फत तसे जाहीर करणे आवश्यक होते. प्राणीसंग्रहालय नेमके किती दिवसांसाठी बंद राहणार याचे प्रसिद्धी पत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्याचे सौजन्यही वनखात्याने दाखविले नाही. त्यामुळे हा गोंधळ उडाला असून गोव्याच्या विविध भागातून, देशाच्या विविध राज्यांतून तसेच विदेशांमधूनही रोज मोठ्या प्रमाणात येणाऱ्या प्राणीप्रेमींची, पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षकानी जनतेला जाहीर सूचना देणे आवश्यक होते. या प्रकाराबद्दल त्यांच्यावर कोणती कारवाई होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता वनमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
या प्रकाराबद्दल खुद्द वनमंत्री विश्वजित राणे अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे. याबाबत आपणास काहीच कल्पना देण्यात आली नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण वृत्तपत्रांपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता जागे झाले आहेत. मात्र एवढे दिवस याबाबत जनतेला, पर्यटकांना कल्पना न दिल्याने त्यांची प्रचंड गैरसोय झाली त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहेच. वनमंत्री आता दत्ता यांच्यावर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.