योग्याची अपूर्ण राहिलेली साधना पुढील जन्मी पूर्ण होते
भगवंत म्हणाले, योगाभ्यास करणाऱ्या साधकाचा मध्येच मृत्यू ओढवल्यास त्याचा योगाभ्यास जरी अपुरा राहिला तरी केलेल्या योगाभ्यासाच्या जोरावर त्याला शंभर यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. त्या पुण्याच्या आधारे स्वर्गातील दिव्य भोग भोगत, हवा तेव्हढा काळ तो तेथे काढू शकत असला तरी त्याचा स्वभाव विषयसुखात रमणारा नसल्याने त्याला कालांतराने त्या नाशवंत सुखाचा कंटाळा येतो. त्याला योगाभ्यासातून मिळणाऱ्या अत्युत्तम सुखाची वारंवार आठवण येऊ लागते. ते सुख पुन्हा मिळवण्यासाठी तो मनुष्यलोकात जन्म घेतो.
त्याला पुढील जन्म उत्तम आणि श्रीमंत कुळात मिळतो. अर्थात येथे आयुष्य घालवत असताना योग्यवेळ येताच त्याच्या पूर्वस्मृती जागृत होऊन त्याला योगाभ्यास करण्याची इच्छा होते. त्यानुसार मागील जन्मी त्याचा जेव्हढा योगाभ्यास झाला असेल त्याची त्याला आठवण होते आणि त्याच्या पुढील योगाभ्यास तो करू लागतो.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, जर त्या योगभ्रष्ट योग्याची अशी इच्छा असेल की, योगी कुळात जन्म व्हावा तर त्याला बुद्धिमान अशा योग्याच्या कुळात त्याचा जन्म होतो. अशा तऱ्हेचा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे.
अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळी चि मग जन्मतो । अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ ।।42 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात की, ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असा साधक त्याच्या इच्छेनुसार योगीकुळात जन्म घेतो. सर्व विश्व ब्रह्माने व्यापलेले आहे हा सिद्धांत त्यांच्या अंगवळणी पडलेला असल्याने त्या अनुभूतीच्या आधारे हे कुळ त्रैलोक्यावर राज्य करत असते. ह्या कुळातील सदस्य नेहमी संतुष्ट रहात असल्याने विवेकबुद्धी ही त्यांची दासी असते. त्यामुळे ते ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करत असतात. अशा कुळात जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ असते.
तिथे तो पूर्व-जन्मीचा बुद्धि-संस्कार जोडुनी । मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ।। 43 ।।
योगाभ्यास अपूर्ण राहिलेल्या योग्याच्या मागील जन्मातील काही इच्छा, वासना अतृप्त राहिल्या असतील, काही भोग भोगायचे राहिले असतील तर तो श्रीमंत आणि योगी कुळात जन्म पावतो. त्या इच्छा तृप्त झाल्यावर, त्याला त्यांचा कंटाळा येऊन तो योगाभ्यासाकडे वळतो. जर मागील जन्मातील वासना, इच्छा अतृप्त राहिल्या नसतील तर मात्र तो योगीकुळात जन्म घेऊन त्वरित योगाभ्यासाला सुरवात करत असल्याने त्याचा योगाभ्यास पूर्ण होतो.
योगी कुळात जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ असते कारण त्यासाठी सध्याच्या जन्मात अंगी निरिच्छता यावी लागते. ज्याला अशी संधी मिळते त्याचे भाग्य उजाडते.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, योगीकुळात ज्याचा जन्म होतो त्याच्या ठिकाणी अल्प वयातच स्वरूपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता, प्रौढ होण्यापूर्वीच, सर्वज्ञता त्याला लहान असतानाच माळ घालते.
क्रमश: