Ratnagiri News | अपूर्ण चिंचाळी पुलामुळे डोकेदुखी वाढणार
पावसाळा सुरू झाला तरी पूल व जोडरस्त्याचे काम अपूर्ण
मंडणगड : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्ग कामानिमित्ताने चिंचाळी धरणाच्या खालील बाजूला असलेला जुना पूल यंदाच्या बांधकाम हंगामाच्या मध्यानांतर तोडून पुलाच्या नवीन कामास सुरवात करण्यात आली. यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. मात्र पावसाळा सुरू झाला तरी पूल व जोडरस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे पावसाने जोर पडकल्यास हे अपूर्ण काम डोकेदुखी वाढवणार आहे. यावर्षी पावसाचे आगमन विलंबाने होऊनही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पावसाने जोर पकडल्यास या मार्गावरील पूर्ण वाहतूक अन्य पर्यायी मार्गांवर वळवण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने तालुकावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यंदाच्या बांधकाम हंगामात म्हाप्रळ ते आंबडवे या अंतरात बहुतांशी रस्त्याचे काम पूर्ण करण्यास यंत्रणा यशस्वी झाली आहे. मात्र पुलाचे काम पूर्ण होऊन त्यावर वाहतूक सुरू न झाल्यास हंगामात केलेली मेहनत फुकट जाणार आहे. धरणाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे या मार्गावरील वाहतूक चिंचाळी पाट मार्गे मंडणगड अशी फिरवावी लागणार आहे.
याकरिता अनेक वर्षे वापरात नसलेल्या या रस्त्यावर 'कार्पेट' टाकण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभाग व ठेकेदार यांना नेमके काय अपेक्षित आहे याबद्दल तालुक्याच्या चिंता वाढल्या आहेत. विलंबाने आलेल्या पावसाचा लाभ घेऊन उर्वरित कालावधीत हा पूल व जोडरस्ता यांचे काम तातडीने पूर्ण करावा अशी मागणी पुढे येत आहे.