संजीवराजेंच्या बंगल्यावर आयकरच्या धाडी
फलटण :
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘सरोज व्हिला’ बंगल्यावर आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. फलटणसह पुणे, मुंबई येथील घरांवर छापे टाकण्यात आले असून गोविंद दूध डेअरी व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचीही चौकशी अधिकारी करीत आहेत.
बुधवार दि. 5 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. या घटनेचे वृत्त शहर व तालुक्यात पसरताच राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘सरोज व्हिला’ बंगल्यासमोर गर्दी केल्याचे चित्र होते. बंगल्याचे प्रवेशव्दार बंद केल्याने व प्रवेशबंदी असल्याने प्रवेशद्वाराबाहेरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.
श्रीमंत रामराजेंचे व्हॉटसअॅपद्वारे आवाहन
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याचे वृत्त शहर व तालुक्यात पसरताच कार्यकर्त्यांनी ‘सरोज व्हिला’ बंगल्यासमोर गर्दी करायला सुरुवात केल्यानंतर कार्यकर्त्यांनी घरासमोर गर्दी करू नये. खात्याला काम करू द्यावे. काळजी नसावी, असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे केले.
कारवाईने अतिशय दु:ख
आयकर विभागाच्या कारवाईचे अतिशय दु:ख होत असून तालुक्याच्या इतिहासातील कारवाईची ही पहिलीच घटना आहे. श्रीमंत संजीवराजे गेली 30-35 वर्षे समाजकारण, राजकारण, सहकार क्षेत्रात काम करीत आहेत. आजअखेर त्यांच्या कामांचे कौतुक सर्वांनीच केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी चांगले काम केल्याने जिल्हा परिषदेला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. संजीवराजे स्वच्छ व पारदर्शी कारभार करणारे नेते आहेत. अशा नेत्यावर कारवाई होत असताना संपुर्ण तालुका हळहळ व्यक्त करीत आहे. देशातील राजकारण गढूळ झाले आहे. राजघराण्याने आम्हाला संयम शिकविला आहे. त्यामुळे आम्ही संयम पाळुन आहोत. आम्हाला खात्री आहे की, या कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही. मात्र चुकीच्या पध्दतीने कारवाई होणार असेल तर आमचा संयम ढासळू शकतो, असे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
संजीवराजेंचे कोणतेही काम स्वच्छ, पारदर्शी व आदर्शवत आहे. ही कारवाई केवळ राजकीय आकसापोटी असुन यातून काहीही निष्पन्न होणार नाही. निर्मळ पाण्यासारख असणारं संजीवराजे यांचे व्यक्तीमत्व यापुढेही असेच राहणार असल्याच्या प्रतिक्रीया राजे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांकडुन व्यक्त केल्या जात आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणेला काहीही सापडले नाही
देश व राज्य उभारणीत श्रीमंत मालोजीराजेंचे मोठे योगदान आहे. आम्ही गेली 30 वर्षे राजकारणात आहोत. हा छापा संजीवराजे यांच्या घरासह माझ्याही घरावर पडला आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणेला काहीही सापडले नाही. त्याप्रमाणे संजीवराजेंच्या चौकशीतही काहीही सापडणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे.
- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर