मध्यप्रदेशात भाजप नेत्यावर प्राप्तिकरची कारवाई
सागर :
मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बंडा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते हरवंश सिंह राठौड यांच्या निवासस्थानी रविवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. या कारवाईची माहिती मिळताच त्यांचे समर्थक निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येत जमले आहेत. प्राप्तिकर विभागाने भाजपचे माजी नगरसेवक राजेश केशरवानी आणि राकेश छाबडा यांच्या घरातही झडती घेतली आहे. हरवंश राठौड हे माजी आमदार असून त्यांचे पिता हरनाम सिंह राठौड हे उमा भारती यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. हरवंश राठौड हे राज्याचे माजी मंत्री असून सागर भाजप जिल्हाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. हरवंश आणि कुलदीप राठौड हे भाजपचे मातब्बर नेते असून त्यांच्या परिवाराचा बुंदेलखंडमध्ये मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. हरवंश सिंह यांचे बंधू कुलदीप हे मोठे मद्य व्यावसायिक आहेत.