आरसीयू विद्यार्थ्यांचा विदेश अभ्यासदौऱ्यात समावेश
पाच विद्यार्थ्यांना मिळणार संधी : कुलगुरु सी. एम. त्यागराज यांची माहिती : सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची निवड
बेळगाव : बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांची थेट विदेशात होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. कर्नाटक राज्य उच्चशिक्षण परिषद व युनायटेड किंगडम यांच्या सहकार्याने ब्रिटिश कौन्सिलने आयोजित केलेल्या स्कॉलर फॉर आऊटस्टँडिंग अंडरग्रज्युएट टॅलेंट अभ्यास दौऱ्यात आरसीयूचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 9 ते 23 नोव्हेंबरदरम्यान या अभ्यास दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्चशिक्षण व संशोधन याविषयी जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दोन आठवड्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सर्व सरकारी पदवी कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली. एकूण 44 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी संगोळ्ळी रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉलेजची विद्यार्थिनी मीरा नदाफ व अनामिका शिंदे, खानापूर येथील सरकारी फर्स्ट ग्रेड कॉलेजचा विद्यार्थी युवराज पाटील तर गोकाक येथील फर्स्ट ग्रेड कॉलेजचा विद्यार्थी जगदीश अरभावी व ज्ञानेश्वरी मादार यांची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा या अभ्यास दौऱ्यामध्ये समावेश केला आहे. अभ्यास दौऱ्याचे नोडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून प्रा. अशोक डिसोजा यांची नियुक्ती केली आहे. या अभ्यास दौऱ्याचा व्हिसा व इतर खर्च ब्रिटिश कौन्सिल उचलेल तर प्रवासाचा खर्च विद्यापीठाकडून केला जाणार आहे. अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेले विद्यार्थी अहवाल तयार करणार असून त्यांच्या ज्ञानाचा वापर इतर विद्यार्थ्यांनाही होणार आहे. यावेळी रजिस्ट्रार संतोष कामगौडा, मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार रवींद्रनाथ कदम, स्वप्ना एम. ए, व्ही. एस. नावी, अशोक डिसोजा यासह इतर उपस्थित होते.
कायद्याच्या चौकटीत राहूनच काम
चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पत्रकारांनी कुलगुरुंना विचारले असता ते म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व काम करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यापुस्तके मिळावीत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोणत्याही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील, असे कुलगुरु त्यागराज यांनी स्पष्ट केले.