For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 ठार

06:12 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 ठार
Advertisement

खैबर पख्तुनख्वामध्ये पोलीस स्थानकाला बनवले लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिह्यात रविवारी एक आत्मघाती हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काबल पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर झालेल्या स्फोटात किमान 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले. तसेच अन्य 10 जण जखमी झाले. आत्मघाती हल्लेखोराने पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करत स्फोट घडवला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला गेटवर अडवून त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आपल्या शरीराला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवला, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

आत्मघाती स्फोटाच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तात्काळ संपूर्ण परिसर सील केला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर फॉरेन्सिक पथके आणि तपास यंत्रणा घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून अतिरिक्त दल तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मघाती स्फोटामुळे घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. आता पोलीस, बचाव पथके व स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले. तातडीने कोणत्याही दहशतवादी संघटनेने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. सुरक्षा यंत्रणा या हल्ल्यामागील व्यक्ती आणि संभाव्य कटाचा तपास करत आहेत.

शांती रॅलीदरम्यान हल्ला

गेल्या काही महिन्यांत स्वात खोऱ्यात वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात काबल चौकात मोठ्या संख्येने लोक निदर्शने करत असताना हा स्फोट झाला. ‘स्वात अमन जिरगा’ या स्थानिक संघटनेने आयोजित केलेल्या या शांतता रॅलीवेळी परिसरात सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करण्याची आणि दहशतवादी हिंसाचार थांबवण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement

.