For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरक्षा परिषदेत भारताचा समावेश करा

06:45 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुरक्षा परिषदेत भारताचा समावेश करा
Advertisement

चार युरोपियन देशांची संयुक्त राष्ट्रसंघात मागणी

Advertisement

► वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वात प्रबळ संस्था असणाऱ्या सुरक्षा परिषदेत भारताचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी चार युरोपियन देशांकडून करण्यात आली आहे. या देशांमध्ये हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया आणि झेक गणराज्य या चार देशांनी मंगळवारी ही मागणी केली. भारत हा ‘जागतिक दक्षिण’ (ग्लोबल साऊथ) भागातील एक महत्वाचा देश असून तो महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. अशा देशाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य म्हणून या परिषदेत समाविष्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन या देशांनी केले.

Advertisement

सुरक्षा परिषदेची स्थापना 1940 या दशकात झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत जगात अनेक क्रांतीकारक परिवर्तने झाली आहेत. मात्र, सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वामध्ये कोणतेही परिवर्तन झालेले नाही. गेल्या 80 वर्षांमध्ये जगातील अनेक देश लोकसंख्येने वाढले, तसेच त्यांची मोठी आर्थिक प्रगती झाली. अशा देशांचा जगाच्या व्यवहारांवर प्रभावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा देशांमध्ये भारत अग्रणी आहे. मात्र, सुरक्षा परिषदेकडून या परिवर्तनांची नोंद घेतली जात नाही. या परिषदेची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच असल्याने तिच्यात सुधारणा होणे आवश्यक आहे, अशा अर्थाचे वक्तव्य या चार देशांनी युनोमध्ये केले आहे.

भारत आठ वेळा साधा सदस्य

सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्टसंघाची सर्वात मोठी आणि अत्याधिक महत्वाची संघटना आहे. या संघटनेत पाच देश सदस्य म्हणून स्थायी आहेत. अन्य 11 देशांचा समावेश निवडणुकीच्या माध्यमातून केला जातो. स्थायी सदस्य देशांना ‘नकाराधिकार’ देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेतील एका स्थायी सदस्याने जरी कोणत्याही प्रस्तावाला विरोध केला, तरी तो प्रस्ताव बारगळतो. आतापर्यंत भारताने सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व आठ वेळा मिळविलेले आहे. 2021 आणि 2022 मध्येही भारत या परिषदेचा अस्थायी सदस्य होता. मात्र, भारताची महत्वाकांक्षा स्थायी सदस्यत्व मिळविण्याची असून त्याला पाठींबाही आहे.

भारताला वाढता पाठिंबा

भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी अनेक सामर्ध्यवान देशांनी आणि महासत्तांनी समर्थन दिले आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या चार देशांनी भारताचा समावेश या परिषदेत स्थायी सदस्य म्हणून व्हावा, यासाठी स्पष्ट आणि जाहीर समर्थन घोषित केले आहे. इतरही जवळपास 100 विकसनशील देशांचा भारताला पाठिंबा आहे. मात्र, भारताला आजवर हे सदस्यत्व मिळालेले नाही. कारण चीनने सातत्याने भारताला विरोध केला आहे. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढवायची असेल, तर तो प्रस्तावही सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांकडून संमत व्हावा लागतो. तथापि, चीनने नेहमी आपला नकाराधिकार उपयोगात आणून भारताचा स्थायी सदस्य म्हणून प्रवेश रोखला आहे.

भारताचा वाढता प्रभाव

भारत हा देश दक्षिण आशियातील सर्वात प्रबळ देश आहे. या भागाची लोकसंख्या जवळपास 200 कोटी, अर्थात जगाच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे. त्यामुळे भारताचा समावेश सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करणारे बरेच देश आहे. भारत हा एक मोठा उत्पादक देश असून तो मोठी बाजारपेठही आहे. त्यामुळे त्याच्या समावेशाची मागणी प्रबळ आहे.

Advertisement
Tags :

.