काश्मीरमधील ‘झेड-मोड’ भुयारी मार्गाचे लोकार्पण
पंतप्रधान मोदींची उपस्थिती : सोनमर्गमधील कनेक्टिव्हिटीला चालना : पर्यटकांचा ओढा वाढणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग भुयारी प्रकल्पाचे म्हणजेच ‘झेड-मोड’ बोगद्याचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या 27 मिनिटांच्या भाषणात जम्मू-काश्मीरमधील लोकांची आणखी एक जुनी मागणी आज पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या भुयारी मार्गामुळे सोनमर्ग परिसर वर्षभर पर्यटनासाठी खुला ठेवण्याचा उद्देश साध्य होणार आहे. हा प्रकल्प प्रादेशिक विकास आणि कनेक्टिव्हिटीमधील एक ऐतिहासिक पाऊल मानला जातो. ‘झेड-मोड’ बोगद्याचे महत्त्व केवळ सामान्य नागरिक आणि पर्यटकांपुरते मर्यादित नाही तर ते सैनिकांच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहे.
श्रीनगर-लेह दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग-1 वर बांधण्यात आलेला ‘झेड-मोड’ भुयारी मार्ग गगनगीर ते सोनमर्ग पर्यंत पसरलेला असून त्याची लांबी 6.5 किमी आहे. या बोगद्याचे नाव ‘झेड-मोड’वरून पडले आहे. जम्मू काश्मीरमधील एक सुंदर पर्यटनस्थळ सोनमर्ग हिवाळ्यात होणाऱ्या मुसळधार बर्फवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथील तापमान उणे 25 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. या काळात सुमारे चार महिने हा भाग देशाच्या इतर भागांपासून तुटलेला राहतो. आता या बोगद्यामुळे पहलगाम आणि गुलमर्गप्रमाणे सोनमर्ग वर्षभर पर्यटकांसाठी उपलब्ध होईल. यामुळे लेह-लडाखमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि प्रवाशांसाठी प्रवास करणे खूप सोपे होईल. हा दोन-लेनचा भुयारी मार्ग आहे. हा बोगदा सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
मी माझे वचन पाळतो : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल येथे ‘झेड-मोड’ बोगद्याचे उद्घाटन केले. श्रीनगर-लेह महामार्ग राष्ट्रीय महामार्ग-1 वर बांधलेला 6.4 किमी लांबीचा दुपदरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. बोगद्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील लडाखची आणखी एक जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. तुम्ही खात्री बाळगा की हे मोदी आहेत, जर त्यांनी वचन दिले तर ते वचन पूर्ण करतात. प्रत्येक कामाची एक वेळ असते. योग्य काम योग्य वेळी होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. दुसरीकडे, याप्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासनही पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
वेळेची बचत अन् सुरक्षित मार्ग
‘झेड-मोड’ बोगद्याच्या उद्घाटनानंतर आता श्रीनगर-लेह महामार्गावरील गगनगीर आणि सोनमर्गमधील एक तासाचे अंतर आता 15 मिनिटात पूर्ण होईल. याशिवाय, वाहनांचा वेगही प्रतितास 30 किमीवरून 70 किमीपर्यंत होईल. पूर्वी हा अवघड डोंगराळ भाग ओलांडण्यासाठी 3 ते 4 तास लागायचे. आता हे अंतर फक्त 45 मिनिटात कापले जाईल. तसेच आता बर्फवृष्टीदरम्यान हिमस्खलन किंवा पावसाळ्यात भूस्खलनामुळे रस्ते बंद होण्याची समस्या कमी होईल.
12 वर्षांत काम पूर्ण
बोगदा प्रकल्पाचे काम 2012 मध्ये सुरू झाले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण 12 वर्षे लागली. 2,700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात बांधकाम सुरू करण्यापूर्वी भूसंपादन आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनावर 36 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा बोगदा प्रकल्प बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला देण्यात आला होता, परंतु नंतर हे काम एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आले. पीपीपी मॉडेल अंतर्गत बांधलेला हा बोगदा ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यान्वित होणार होता, परंतु कोरोना काळात बांधकामाला वेळ लागला. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याचे उद्घाटन आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आले होते.
हिमस्खलनापासून संरक्षण
‘झेड-मोड’ बोगदा 2,637 मीटर उंचीवर म्हणजेच समुद्रसपाटीपासून 5,652 फूट उंचीवर बांधला आहे. यातील भुयारी मार्ग सध्याच्या झेड आकार रस्त्यापासून सुमारे 400 मीटर खाली बांधण्यात आला आहे. या बोगद्यामध्ये अनेक क्रॉस गॅलरी असून त्या आग किंवा इतर आपत्तींमध्ये वापरता येतात. या गॅलरी मोटार वाहनांसाठी किंवा पादचाऱ्यांसाठी वापरल्या जाऊ शकतात. हा बोगदा पूर्णपणे हिमस्खलन-प्रतिरोधक बनवण्यात आला असल्यामुळे प्रवाशांना वर्षभर अखंड प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
एनएटीएम तंत्रज्ञानाचा वापर
‘झेड-मोड’ हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा (एनएटीएम) वापर करून बांधला आहे. या प्रक्रियेत बोगदा खोदण्यासोबतच आत जाण्याचा मार्गही सुसज्ज केला जातो. या पद्धतीमुळे बोगद्याची भिंतदेखील तयार होत असल्यामुळे डोंगर कोसळण्याचा धोका टळतो. ‘एनएटीएम’ तंत्रज्ञानामध्ये बोगद्याचे काम सुरू होण्यापूर्वी पर्वत, त्याच्या सभोवतालचे हवामान आणि मातीची तपासणी केली जाते. डोंगराच्या पायाला नुकसान होऊ नये आणि अपघात होऊ नये म्हणून बोगद्याच्या प्रक्रियेत एकाच वेळी किती यंत्रसामग्री आणि किती लोक काम करू शकतील याचा अंदाज लावला जातो.
‘झेड-मोड’ बोगद्याबद्दल...
6.500 किमी : भुयारी मार्गाची लांबी
2,637 मीटर : समुद्रसपाटीपासूनची उंची
15 मिनिटात भुयारी मार्ग पार करता येणार
गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर-सोनमर्गला जोडणार
श्रीनगर-लेह महामार्ग क्रमांक-1 वर निर्मिती