महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्ध विमान उत्पादन केंद्राचे उद्घाटन

06:58 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्पेनचे पंतप्रधान सांचेझ यांच्या हस्ते बडोदा येथे कार्यक्रम

Advertisement

वृत्तसंस्था / बडोदा

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते गुजरातमधील बडोदा येथे युद्ध वाहतूक विमान निर्मिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे उत्पादन केंद्र टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स् लिमिटेड आणि स्पेनची या कंपनीचे आहे. हा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या उत्पादन केंद्रामुळे भारतीय भूसेनेची वाहतूक विमानांची आवश्यकता पूर्ण होणार असून भूसेनेचे बळ वाढणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

या उत्पादन केंद्रातून पहिले सैनिकी वाहतूक विमान 2026 मध्ये बाहेर पडणार आहे. हा भारत, फ्रान्स आणि स्पेन या तीन देशांच्या सहभागाने आकारास आलेला संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत पहिली 16 विमाने फ्रान्सच्या एअरबस या कंपनीकडून तयार स्थितीत भारताला मिळणार आहेत. तर आणखी 40 विमाने बडोदा येथील उत्पादन केंद्रात निर्माण केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाअंतर्गत हे उत्पादन होणार असून हा संरक्षण क्षेत्रातला प्रथम मेक इन इंडिया प्रकल्प आहे, अशी माहिती भारताच्या संरक्षण विभागाने दिली आहे.

एव्हरोचे स्थान घेणार

सध्या भारतात एव्हरो-748 जातीची सैनिकी वाहतूक विमाने आहेत. आता या विमानांचे स्थान टाटा प्रकल्पातून निर्माण झालेली नवी सी-295 जातीची विमाने घेणार आहेत. एअरबस या कंपनीचे तंत्रज्ञान या विमानांसाठी उपयोगात आणण्यात येणार असून ही अत्याधुनिक सैनिकी वाहतून विमाने आहेत.

भारत-स्पेन जवळीक

या विमान प्रकल्पामुळे भारत आणि स्पेन यांच्यात सामरिक भागिदारी निर्माण होणार आहे. दोन्ही देशांमध्ये निकटचे परस्पर संबंध निर्माण होण्यात हा प्रकल्प महत्वाची भूमिका साकारणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर केलेल्या भाषणात सांचेझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा हा आणखी एक विजय आहे. या प्रकल्पामुळे भारताचे सैनिकी बळ आणखी वाढणार आहे, अशी भलावण त्यांनी केली.

संबंधांना नवी दिशा

पेड्रो सांचेझ यांचा हा प्रथमच भारत दौरा आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि स्पेन यांच्या भागिदारीला एक नवी दिशा मिळणार आहे. स्पेनच्या साहाय्याने साकारलेल्या या सैनिकी वाहतूक विमान प्रकल्पामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला बळ मिळेल. तसेच दोन्ही देशांमध्ये एका नव्या सहकार्य युगाचा प्रारंभ होईल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

शोभायात्रेचे आयोजन, चर्चा

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ भारत दौऱ्यावर आलेले असून बडोदा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सन्मानार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत बडोद्यातील असंख्य नागरिक समाविष्ट झाले होते. नंतर टाटा उद्योगसमूहाच्या परिसरात युद्ध वाहतूक विमान प्रकल्पाचे उद्घाटन दोन्ही नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांचेझ यांच्यात लक्ष्मीविलास पॅलेस येथे द्विपक्षीय चर्चाही झाली.

मुंबईत आगमन

सोमवारी दुपारनंतर सांचेझ यांचे मुंबईत आगमन झाले. तेथे त्यांनी स्पेन इंडिया कौन्सिल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी विविध औद्योगिक संघटना आणि उद्योगपतींशी औद्योगिक आणि आर्थिक सहकार्यासंबंधी चर्चा केली. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती केंद्रांनाही भेट दिली आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी चर्चा केली. भारत आणि स्पेन यांनी प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य करण्याचे ठरविले असून या योजनेचा एक भाग म्हणून सांचेझ यांनी प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. मुंबईत सांचेझ यांचे वास्तव्य मंगळवारपर्यंत असून मंगळवारीही ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

कसे आहे ‘सी-295’

ड अत्याधुनिक सैनिकी वाहतूक विमान म्हणून जगभरात ते ख्यातीप्राप्त

ड एकावेळी 71 सैनिक किंवा 50 पॅरेशूटधारी सैनिकांची वाहतूक शक्य

ड मध्यम आकाराचे असल्याने कानाकोपऱ्यात वाहतूक करण्याची क्षमता

ड सैनिकांप्रमाणेच भूसेनेला उपयोगी असणाऱ्या साधनांची वाहतूकही शक्य

ड अशी चाळीस विमाने या प्रथम टप्प्यात भारतात निर्माण केली जाणार

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article