ट्रम्प यांच्या ‘शांतता मंडळा’चे उद्घाटन
काही देश उपस्थित, भारतासह अनेक अनुपस्थित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, डावोस
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘शांतता मंडळा’चे (बोर्ड ऑफ पीस) उद्घाटन डावोस येथे केले आहे. या उद्घाटन समारंभाला अमेरिकेसह 19 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. तथापि, भारत आणि अनेक देश मात्र अनुपस्थित राहिले आहेत. ट्रम्प यांनी या मंडळात समाविष्ट होण्यासाठी भारत, चीन तसेच इतर अनेक देशांना निमंत्रण दिले होते. त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करुन काही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक देशांनी अद्याप या मंडळात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतलेला नाही. गेल्या रविवारी भारतालाही अध्यक्ष ट्रम्प यांनी या मंडळात समाविष्ट होण्याचे आमंत्रण पाठविले आहे.
भारताने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ब्रिटन, फ्रान्स, चीन आदी देशांनीही यासंबंधीचा निर्णय घेतला नाही. इस्रायलनजीक असलेल्या गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करणे आणि गाझा पट्टीचा विकास करणे, हे मंडळ स्थापन करण्याचे प्राथमिक उद्देश आहेत. तथापि, मंडळाच्या उद्देशपत्रामध्ये गाझा हा शब्द आलेला नाही. तसेच केवळ गाझा पट्टी नव्हे, तर संपूर्ण जगातच कोठे सशस्त्र संघर्ष होत असेल, तर तो थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचे व्यापक उद्दिष्ट्या आता या मंडळाने ठेवले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. अनेक मान्यवर नेते या मंडळाचे सदस्य आहेत.
भारताची भूमिका
भारताने अद्याप या मंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, समाविष्ट होण्याचे आमंत्रण नाकारलेलेही नाही. भारताची भूमिका ‘थांबा आणि वाट पहा’ अशी आहे. अन्य अनेक मोठ्या देशांनीही हेच धोरण स्वीकारले आहे. गुरुवारी डावोस येथे या मंडळाच्या उद्देशपत्रावर उपस्थित देशांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या करुन या मंडळाच्या कार्याला औपचारिकरित्या प्रारंभ केला आहे, अशी माहिती देण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत अशा एका प्रभावी गटाची आवश्यकता विश्वशांतीसाठी आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
कोणते देश उपस्थित...
या मंडळाच्या उद्घाटन समारंभाला अर्जेंटिना, पाकिस्तान, बहारीन, सौदी अरेबिया, पेराग्वे, इस्रायल, अर्मेनिया, अझरबैजान, मोरोक्को, जॉर्डन, कझाकिस्तान, कोसोव्हो, उझबेकिस्तान, मंगोलिया, तुर्कस्थान, कतार, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, बुल्गारिया, हंगेरी आदी देशांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी उपस्थित होते. तथापि, नॉर्वे, स्वीडन, इटली आदी देशांनी या आमंत्रणाचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. तर भारत, चीन, ब्रिटन, फ्रान्स आदी देशांनी अद्याप त्यांचा निर्णय घेतलेला नाही. ट्रम्प यांनी रशियालाही या मंडळात समाविष्ट होण्याचे आमंत्रण पाठविले आहे. त्यांचे आमंत्रण विचाराधीन आहे, असे रशियाने स्पष्ट केले आहे.
पोप लिओ यांना आमंत्रण
कॅथॉलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मपीठ असणाऱ्या व्हॅटिकनलाही या मंडळात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, व्हॅटिकनचे सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांच्या विचाराधीन हे आमंत्रण आहे. त्यांना निर्णय घेण्यास काहीसा वेळ लागणार आहे, असे व्हॅटिकनकडून स्पष्ट करण्यात आले.
हा महत्वाचा दिवस...
‘शांतता मंडळ’ किंवा ‘बोर्ड ऑफ पीस’ची स्थापना हा जगाच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे. असा दिवस आजवर कधी उगवला नव्हता. जगात शांतता निर्माण करण्याच्या महान उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. आणखी अनेक देश आमच्यासह येण्यास सज्ज आहेत. आगामी काळात या मंडळाची सदस्यसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले. या मंडळाचे सदस्यत्व तीन वर्षांसाठी हवे असेल, तर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, स्थायी सदस्यत्व हवे असेल, तर 100 कोटी डॉलर्सचे शुल्क ठेवण्यात आले आहे.