लोकमान्य श्रीराम मंदिरात बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन
बेळगाव : आचार्य गल्ली, गाडेमार्ग, शहापूर येथील पुरातन मंदिर लोकमान्य श्रीराम मंदिर येथे जीवनविद्या मिशन बेळगाव शाखांतर्गत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून रविवार दि. 31 मे रोजी बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील प्रवचनकार निवेदिता धावडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. निवेदिता धावडे यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामय्याचे तसेच सद्गुरु श्री पै माऊलींचे पूजन केले. आशाताई गिनगिने आणि कस्तुरी बेटगिरी यांनी निवेदिता धावडे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी धावडे यांनी मुलांनी अभ्यास कसा करावा, अभ्यास करण्यासाठी एकाग्रता आणि आपलं ध्येय, सातत्य राखणे या विषयावर मार्गदर्शन केले.
हे बालसंस्कार केंद्र सुरू करण्यासाठी सुधीर कालकुंद्रीकर, सुमन लोहार, विशाखा पाठक, तृप्ती हेरेकर, सायली कालकुंद्रीकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे बालसंस्कार केंद्र यशस्वी करण्यासाठी शहापूर, होसूर, खासबाग परिसरातील साठहून अधिक बालचमू उपस्थित होते. जीवनविद्या मिशनचे पदाधिकारी शैलेश शिरोडकर, दीपक बिर्जे, तानाजी पाटील, सतीश बेकवाडकर तसेच ज्येष्ठ प्रवचनकार शंकरराव बांदकर यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर तसेच लोकमान्य श्रीराम मंदिर ट्रस्टचे सुबोध गावडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.