अंकोला येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण
आगामी अर्थसंकल्पात सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी तरतूद : कर्करोग युनिट सुरू करणार
कारवार : राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते रविवारी अंकोला तालुक्यातील गंगावळी नदीवरील मंजुगुणी पुलाचे आणि येथील किम्सच्या आवारातील 450 बेड्सची क्षमता असलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. अंकोला आणि कुमठा तालुक्यांना जोडणाऱ्या मंजुगुणी पुलावर सुमारे 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलाची लांबी सुमारे 800 मीटर आहे. येथील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गंगावळी नदीवरील पुलाचे उद्घाटन करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, गंगावळी नदीवरील मंजुगुणी पुलाचे उद्घाटन 2017 मध्ये आपल्याच हस्ते करण्यात आले होते. 8-9 वर्षांनंतर या पुलाचे उद्घाटन आपल्याच हस्ते होत आहे. याचा फार मोठा अभिमान आणि आनंद होत आहे. यापूर्वी भाजप सरकारने पूल पूर्णत्वाला नेण्यामध्ये अपेक्षित रस दाखविला नाही. त्यामुळे इतकी वर्षे जनतेला वाट पाहावी लागली. या पुलामुळे सुमारे 18 कि.मी. इतके अंतर वळसा घालण्याची वेळ आता येणार नाही. या पुलामुळे गोकर्णसह परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.
जूनच्या अगोदर निवडणुका
सिद्धरामय्या पुढे म्हणाले, जून महिन्याच्या अगोदर राज्यातील जि. पं., ता. पं. आणि ग्रा.पं. निवडणुका घेण्यात येतील. या दिशेने सरकारची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील आप्पाडीचे श्री क्षेत्र गोकर्ण ग्रामपंचायतीचे परिवर्तन नगरपंचायतीमध्ये करावे, अशी मागणी कुमठ्याचे आमदार दिनकर शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांच्या प्रस्तावाचा विचार निवडणुकांनंतर करण्यात येईल. जिल्ह्यातील अति मागासलेल्या हालक्की वक्कलिग समाजाचा निर्णय अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये करायचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे.
प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज
येथील किम्स आवारात बांधण्यात आलेल्या रुग्णालय इमारतीचे उद्घाटनप्रसंगी सिद्धरामय्या म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 22 जिल्ह्यांमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. बागलकोट आणि कोलार जिल्ह्यांसाठी महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. उर्वरित 5-6 जिल्ह्यांसाठीही वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात येतील. कारवारात 2016 मध्येच वैद्यकीय कॉलेज मंजूर करण्यात आली आहेत. केवळ वैद्यकीय कॉलेजवरच समाधान न मानण्याचा काँग्रेस सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा विचार आहे.
येत्या अर्थसंकल्पात कारवार येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी तरतूद
कारवारात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केल्याने येथील रुग्णांना हुबळी, गोवा, उडुपी, मणीपाल, मंगळूर येथे जाण्याचा त्रास वाचला आहे. कारवारात सुपर स्पेशालिटीची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आगामी अर्थसंकल्पात येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसाठी तरतूद करण्यात येईल. याशिवाय येथे कर्करोग युनिटही सुरू करण्यात येईल.
गॅरंटीवर राज्यात 1 लाख 18 हजार कोटी खर्च
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारने राज्यात गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीसाठी 1 लाख 18 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. कारवार जिल्ह्यासाठी 2954 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपकडून गॅरंटीच्या अंमलबजावणीमुळे सरकारकडे अभिवृद्धीसाठी पैसेच नाहीत, असा सातत्याने आरोप केला जात आहे. तथापि भाजपच्या आरोपामध्ये काही एक तथ्य नाही. भाजपला आपले सरकार सत्तेत असताना जे आम्ही करून दाखविले ते करता आले नाही. आमच्याकडे गॅरंटीच्या अंमलबजावणी आणि अभिवृद्धीसाठी पुरेसा निधी आहे.
मंत्र्यांची समयोचित भाषणे
यावेळी माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांची समयोचित भाषणे झाली. व्यासपीठावर शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक, यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी, जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, किम्सच्या संचालिका डॉ. पौर्णिमा आदी उपस्थित होते.