तामिळनाडूत अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम, स्टॅलिनकडून भाषेचा प्रश्न उपस्थित
चेन्नई / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूसाठी 31,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली असून 1,800 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन केले आहे. गुरुवारी त्यांच्या हस्ते अनेक योजनांचा शिलान्यास करण्यात आला. मात्र, याचवेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी विरुद्ध तामिळ असा वाद उपस्थित करुन भाषिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.
दक्षिण तामिळनाडूत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची 75 केलोमीटर लांबीचा मदुराई-टेनी रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. चेन्नईत गरीबांसाठी बांधण्यात आलेल्या 1,152 स्वस्त घरांच्या योजनेचे उद्घाटनही करण्यात आले. ही घरे कारखान्यात निर्माण पेलेल्या भिंतीपासून तयार करण्यात आली आहेत. अमेरिका आणि फिनलंड येथे अशी घरे बांधण्यात येतात. याशिवाय पाच रेल्वे स्थानके बांधण्याची योजना, रेल्वे स्थानक सुधारणा योजना आदी योजनांचे उद्घाटनही करण्यात आले आहे.
बेंगळूर-चेन्नई एक्स्प्रेसवे
पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते बेंगळूर-चेन्नई एक्स्प्रेसवे प्रकल्पाचा शिलान्यासही करण्यात आला. ही केंद्र सरकाराची योजना आहे. यामुळे या दोन महत्वाच्या शहरांमधील प्रवासाचे अंतर बरेच कमी होणार आहे. यासह आणखी 11 प्रकल्पांचा शिलान्यासही करण्यात आला. येत्या पाच वर्षांमध्ये ते पूर्ण होणार आहेत.
भाषावादाचे राजकारण
पंतप्रधान मोदींनी हिंदी भाषा आमच्यावर लादू नये. तामिळ आणि हिंदी या दोन्ही भाषांना समान स्थान प्रदान करावे, अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतच त्यांनी ही मागणी केली. श्रीलंकेच्या कार्यकक्षेत असणारे कच्चातीवू हे द्वीप भारतात आणले जावे. त्यामुळे तामिळनाडूतील मच्छीमारांना स्वतंत्ररित्या मासेमारी करणे सुलभ होईल, अशी नवी मागणीही स्टॅलिन यांनी केल्याचे दिसून आले. या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.