रशियाच्या ‘नेव्हल मॉन्स्टर’चे उद्घाटन
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियाने 10 हजार कोटी डॉलर्स (8 लाख 75 हजार कोटी रुपये) खर्चून निर्माण केलेल्या ‘नेव्हल मॉन्स्टर’ नामक समुद्री युद्धयंत्रणेचे उद्घाटन त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. ही यंत्रणा युरोप आणि नाटो यांच्या छातीत धडकी भरविणारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटन करताना केले.
या युद्धयंत्रणेमुळे रशियाच्या नौदलाचे अत्याधुनिकीकरण होणार आहे. यदाकदाचित तिसरे महायुद्ध झालेच, तर ते जिंकण्यासाठी ही यंत्रणा रशियाला साहाय्यभूत ठरणार आहे. या यंत्रणेत युद्धनौका, विमानवाहू युद्धनौका, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, समुद्री विमाने, प्रबळ रडार यंत्रणा आणि अनेक आक्रमक नौकांचा समावेश राहणार आहे. रशियाच्या नौदलाचा संपूर्ण कायापालट करण्याचा पुतीन यांचा विचार आहे. येत्या दहा वर्षांमध्ये ही यंत्रणा पूर्णत्वास नेली जाणार असून संपूर्ण ऊर्वरित युरोपच्या नौदल सामर्थ्यापेक्षा एकट्या रशियाचे नौदल सामर्थ्य अधिक करण्याच्या हेतूने ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.