विलवडेत वाचन, गायन, अभिनय ,कथा ,नाट्यलेखन कार्यशाळेचे उद्घाटन
मुंबई येथील वेदार्थ या संस्थेचा उपक्रम
ओटवणे । प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वावं देण्यासाठी वाचन, गायन, अभिनय कथा व नाट्य लेखन कार्यशाळा ही फार मोठी संधी आहे. मुंबई येथील वेदार्थ या संस्थेच्या या उपक्रमातून प्रत्येकाने आदर्श विद्यार्थी, उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन विलवडे ग्रामोन्नती मंडळाचे माजी सरचिटणीस राजाराम दळवी यांनी केले. मुंबई येथील वेदार्थ या संस्थेच्यावतीने विलवडे (ता. सावंतवाडी) ग्रामोन्नती मंडळ, मुंबई संचलित विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय या प्रशालेत सुरू करण्यात येत असलेल्या वाचन, गायन, अभिनय, कथा व नाट्य लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी राजाराम दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई येथील वेदार्थ संस्थेचे संस्थापक श्रीम. शरयू देसाई, संस्थेचे मार्गदर्शक प्रितेश कोसंबे, सरपंच प्रकाश दळवी, विलवडे स्कुल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, खजिनदार सुरेश सावंत, मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, शिक्षक मुकुंद कांबळे, कर्मचारी बाबू दळवी उपस्थित होते.यावेळी सरपंच प्रकाश दळवी यांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. प्रफुल्ल सावंत यांनी हा एक आगळा वेगळा उपक्रम असून याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सुरेश सावंत यांनी आपल्या धकाधकीच्या आजच्या जीवनातील ताण कमी होण्यासाठी जीवनामध्ये एकतरी छंद जोपासण्याचे आवाहन केले. बुद्धभूषण हेवाळकर यांनी ही कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या शनिवार व रविवारी होणार असल्याचे सांगून या संधीचा आपल्या मुलांना फायदा होण्यासाठी ज्या पालकांना आपल्या मुलांना शिबिरामध्ये सहभाग द्यावयाचा आहे त्यांनी शाळेशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे शिक्षक मुकुंद कांबळे यांनी केले.