For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

06:45 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम, नितीशकुमारही उपस्थित, विरोधकांवर हल्लाबोल

Advertisement

वृत्तसंस्था /औरंगाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात 21,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमाला त्यांच्यासमवेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राज्यपाल राजेंद्र अर्लेकर हे देखील उपस्थित होते. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा आणि अनेक केंद्रीय मंत्री यांचीही उपस्थिती होती.

Advertisement

बिहारमध्ये नितीशकुमार यांनी विरोधकांच्या आघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाशी पुन्हा हातमिळवणी केल्यानंतरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा प्रथमच बिहार दौरा आहे. शनिवारच्या कार्यक्रमात त्यांनी 18 हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच गंगा नदीवरील सहा पदरी सेतू प्रकल्पाची कोनशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. त्यांनी पूर्ण झालेले तीन रेल्वे प्रकल्प राष्ट्रला अर्पण केले. या प्रकल्पांमध्ये पाटलीपुत्र-पहलेजा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रकल्पाचाही समावेश आहे.

नमामी गंगे प्रकल्पांचेही उद्घाटन

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमामी गंगे’ या योजनेअंतर्गत 12 विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांसाठी 2,190 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पाटणा, सोनेपूर, नौगाचिया आणि छाप्रा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे एकात्मता मॉलच्या प्रकल्पाची कोनशीला स्थापन केली.

जाहीर सभेत विरोधकांवर टीका

प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर औरंगाबाद येथे आयोजित एका प्रचंड जाहीर सभेत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी विरोधकांवर विकासविरोधी राजकारण करत असल्याची टीका केली. केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना हाती घेतल्या. त्यांच्यापैकी अनेक योजना निर्धारित वेळेच्या आधीच पूर्णही केल्या. या योजनांचा लाभ आता गरीबांना मिळण्यास प्रारंभ झाला आहे. विरोधकांकडे केवळ आपल्यावर टीका करण्याशिवाय दुसरा कार्यक्रमच उरलेला नाही. जनतेचा आता विरोधकांवर विश्वास उरलेला नसून ती भारतीय जनता पक्षाकडेच आशेने पहात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केले.

भारत विकसीत राष्ट्र होणार

2047 पर्यंत, म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत भारत हे विकसीत राष्ट्र होईल. त्यासाठी आपले सरकार कटीबद्ध आहे. भारता आता जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असून येत्या पाच वर्षांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होईल. भारताची पायाभरणी गेल्या 10 वर्षांमध्ये भक्कमरित्या झाली असून आता त्याला विकासीत राष्ट होण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला, गरीब, युवकांसाठी कार्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला उपस्थित विशाल जनसमूहासमोर केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये पूर्ण केलेल्या योजनांची माहिती दिली. आमच्या सरकारच्या कामाचा वेग त्यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या काळात नव्हता, एवढा प्रचंड आहे. आम्ही जी कामे या तुलनेने मर्यादित काळात केली आहेत, ती पूर्वीच्या सरकारांच्या वेगाने होत राहिली असती, तर ती पूर्ण होण्यास तीस ते पन्नास वर्षांचा आणखी कालावधी लागला असता, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

विरोधकांचा विचार केवळ घराण्यांसाठी

विरोधकांचा सगळा वेळ केवळ स्वत:च्या घराण्यांचे हित सांभाळण्यात खर्च होत आहे. हे पक्ष चालविणारी घराणी केवळ स्वत:च्या लाभाचा विचार करतात. त्यामुळे ते स्वत:च्या कार्यकर्त्यांकडेही सत्तासूत्रे जाऊ देत नाहीत. यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून ते दुसरा मार्ग शोधीत आहेत. याचे उत्तरदायित्व केवळ याच घराणेशाही मानणाऱ्या नेत्यावर आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

गरीबांचा विकास हाच देशाचा विकास

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगाशुद्धीकरण प्रकल्पांचे उद्घाटन

ड गेल्या दहा वर्षांमध्ये गरीबांच्या विकासालाच दिले सर्वतोपरी प्राधान्य

ड केंद्र सरकारच्या कामाचा झपाटा पूर्वीच्या सरकारांपेक्षा कितीतरी जास्त

ड गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक प्रकल्प पूर्ण केल्याने सर्वसामान्यांचा लाभ

Advertisement
Tags :

.