'गॅलेक्सी सोसायटी' च्या फलटण शाखेचा शुभारंभ
फलटण :
के.बी. उद्योग समूहातील सर्व विभागांप्रमाणे पतसंस्थेतही दूरदर्शीपणे चांगले निर्णय घेतल्याने स्पर्धेच्या युगात या संस्थेची प्रगती उत्तम असल्याचे सांगत अनेक प्रसंगांना सामोरे जात असताना यशाचे एकेक पाऊल निर्धाराने पुढे टाकत आपण यशस्वी होत आहात, हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले आहे.
गॅलेक्सी को-ऑप.क्रेडिट सोसायटीच्या फलटण येथील चौथ्या शाखेचा कामकाज शुभारंभ रामभाऊ लेंभे यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी के.बी. उद्योग समूहाचे संचालक व गॅलेक्सीचे चेअरमन सचिन यादव होते.
रामभाऊ लेंभे म्हणाले, कर्ज वितरणात अनंत अडचणी आहेत. आपण नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहात. विशेषत? एखाद्या चांगल्या बँकेपेक्षा उत्तम पद्धतीने डिजिटल बँकिंग सुरु करुन 1400 अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन उत्तम संघटन कौशल्याद्वारे चांगले काम करत असून अवघ्या 4 ते 5 वर्षात गरुड भरारी घेतली असल्याबद्दल मी सचिन यादव व सहक्रायांचे कौतुक करतो. सलग 40 ते 50 वर्षे या क्षेत्रात काम करताना अनंत अनुभव गाठीशी असल्याने अल्पावधीत या सर्वांवर मात करुन अनोख्या पद्धतीद्वारे कामकाज करून नावारुपाला आणलेल्या गॅलेक्सी पतसंस्थेचा हेवा वाटावा असे उत्तम काम करत आहात. आपल्या संस्थेची प्रगती इतरांना मार्गदर्शक ठरेल .
गॅलेक्सीचे चेअरमन सचिन यादव म्हणाले, आर्थिक संस्था चालविताना फार काळजी घ्यावी लागते. ठेवीदारांनी पैसा सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपल्यावर सोपविलेली असते, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून गॅलेक्सी चालविताना कधीही गफलत होऊ दिली नाही. कंपनी चालविताना आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्व असते. के.बी. मध्ये 6 संस्था चालविताना अत्यंत काटेकोर नियोजन करावे लागते, ते उत्तम असल्याने चिंता नाही. गॅलेक्सी चालविताना ही संस्था वेगळी ठेवून येथील 48 अधिकारी व कर्मच्रायांवर विश्वास ठेवून त्यांच्या क्षमता विकसित करुन त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. संस्था उभारताना पहिल्या 5 वर्षाचे नियोजन व प्रगतीचा आराखडा निश्चित करण्याची आणि आराखड्यानुसार कामकाज होईल यासाठी प्रयत्न करण्याची आपली पद्धत आहे, त्याप्रमाणे आपण नेहमी यशस्वी झालो आहोत.
प्रारंभी संचालक अॅड. लोंढे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गॅलेक्सी संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी केले. तज्ञ संचालक लक्ष्मण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन योगेश रघुनाथ यादव यांच्यासह संचालक, सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, शहरातील नागरिक, के. बी. उद्योग समूहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.